Loksabha election : वऱ्हाडी भाषेतून शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. वर्ध्यातून लढण्यासाठी कराळेंनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पुण्यात कराळेंनी पवारांची भेटही घेतली आहे. आपल्या गावयान स्ट्राईनं विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आणि फेमस् यू ट्युबर थेट लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
नितेश कराळेंनी पुण्यात शरद पवारांची भेटही घेतली आहे. वर्ध्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटाची मागणीही केली. याआधीही शरद पवारांसोबत त्यांची भेट झालीये. शरद पवार गट सकारात्मक असल्याचा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे.
वर्ध्यातून भाजपकडून रामदास तडस विद्यमान खासदार आहेत आणि भाजपनं पुन्हा त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केलीये. त्यामुळं वर्ध्यातून रामदास तडसांचा सामना शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात होईल. त्यातच कराळे मास्तरांच्या नावाची सध्या चर्चा सुरु झालीये.
नितेश कराळे वर्ध्यात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतात. वऱ्हाडी भाषेतील शिकवणीमुळं कराळे मास्तर सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठी रस्त्यावर उतरुन कराळे आंदोलनात सक्रीय असतात. कराळेंनी 2020 मध्ये नागपूर पदवीधर निवडणूकही लढवली आहे. पदवीधर निवडणुकीत अपक्ष लढत तिसऱ्या क्रमांकांची 8500 एवढी मतं घेऊन लक्ष वेधलं होतं.
शिकवणी क्लासेसच्या व्यतिरिक्त व्हिडीओतून कराळे मास्तरांचा सूर, भाजप सरकारच्या विरोधीच राहिलेला आहे. आता वर्ध्यातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठीही त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे धाव घेतली आहे.
दुसरीकडे माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माढा लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहितेंनी प्रचाराची सुरुवात केली आहे. उमेदवारीचा वाद मिटल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. मात्र धैर्यशील पाटील आणि त्यांचे समर्थक भाजपच्या नाईक-निंबाळकरांना मदत करण्यास तयार नाहीत. करमाळ्यानंतर सांगोला तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी भेटीगाठी घेतल्या आहेत.
इकडे सांगलीत मविआतला तिढा सुटलेला नाही. चंद्रहार पाटलांच्या प्रवेशानंतर सांगलीची जागा शिवसेना लढवणार म्हणून ठाकरेंनी संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस देखील पारंपरिक जागा सोडायला तयार नाही.