अहमदनगर (कुणाल जायकर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना ग्राम पंचायत निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आता रोहित पवार यांचे आणखी एक कट्टर समर्थक भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. मागच्याच आठवड्यात जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. जवळा ग्रामपंचायत ही स्थानिक आघाडीने जिंकली होती. सरपंच सुभाष आव्हाड यांनी राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला होता. युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता.
आता रोहित पवार यांचे कट्टर समर्थक परमवीर पांडुळे यांनी भाजप आमदार राम शिंदे यांची भेट घेतली आहे. परमवीर पांडुळे हे मिरजगांव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. पांडुळे यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पांडुळे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासाठी हा धक्का आहे. “आपला तो आपला, राम शिंदे यांनी सहकार्य केले. मात्र मी त्यांची परतफेड करू शकलो नाही. या पुढे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार” असं परमवीर पांडुळे म्हणाले.
कर्जत-जामखेडमध्ये कोणाकडे किती ग्रामपंचायती?
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायची जिंकल्याच. पण खासकरुन कर्जत-जामखेडच्या ग्रामपंचायत निकालांवर राजकीय जाणाकारांच लक्ष होतं. कारण कर्जत-जामखेडमध्ये एकूण 9 ग्राम पंचायती आहेत. यात भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 ग्रामपंचायती आहेत. आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 ग्रामपंचायती आहेत. 1 ग्राम पंचायत अजित पवार गटाकडे आहे. तर 1 स्थानिक आघाडीकडे आहे. स्थानिक आघाडीकडे जी ग्राम पंचायत होती, त्याच्या सरपंचाने भाजपात प्रवेश केला. म्हणजे कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. सहाजिकच राम शिंदे यांना याचा फायदा होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपाचे दिग्गज नेते राम शिंदे यांना पराभूत केलं होतं.