सोलापूरः महाराष्ट्र कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्न आता आणखीच चिघळण्याची चिन्ह आहेत. सोलापुरातील (Solapur) २८ गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. तर आज यापैकी गावात कर्नाटकचे झेंडेही फडकले. काही कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा विजय असो… बोम्मई (Basavraj Bommai) सरकार जिंदाबाद असे नारे लगावले. कर्नाटकचे शेले अंगावर घेतलेले आणि हातात कर्नाटकचे झेंडे असलेले अनेक कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना दिसून आले. अक्कलकोट तालुक्यातील अळगी गावात हा प्रकार घडला.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आधी सांगली आणि नंतर सोलापुरातील अक्कलकोटवर दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी इथली एक इंचही जमीन कर्नाटकला देणार नसल्याचं सांगितलं.
मात्र दुसरीकडे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील 28 गावांनी कर्नाटक सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही या गावांनी संमत केला आहे.
आम्हाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आम्हाला नीटनिटके रस्ते देखील मिळालेले नाहीत. सातत्याने आम्हाला डावलले जात आहे, अशा भावना या गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
2019 च्या लोकसभेला या 28 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. त्याचीही दखल राज्यकर्त्यांनी घेतली नाही. मतदान करा अशी विनंती ही तत्कालीन उमेदवारांनी केली नसल्याची खंत ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
त्यामुळेच सुविधांअभावी संतापलेल्या गावकऱ्यांनी आता कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज तेथे कर्नाटकाचे झेंडे फडकवण्यात आले.