कर्नाटक राज्यातील हिजाब (Karnataka Hijab) प्रकरणाचे पडसाद आज महाराष्ट्रात सर्वत्र पहायला मिळाले. तेथील उडपी जिल्ह्यात एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावरून प्रवेश नाकारण्यात आला होता. याविरोधात विद्यार्थिनींनी कर्नाटक हायकोर्टात (Karnataka High court) धाव घेतली. हिजाब घालण्यावरून शिक्षणाचा मूलभूत अधिकार तुम्ही नाकारू शकत नाहीत, असा सूर सर्वत्र उमटत असून याविरोधात आज महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील बीड, लातूर, नांदेड, सोलापूरसह इतरत्र कर्नाटकात घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. कुठे एमआयएम पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं तर कुठे महिला आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत याविरोधात घोषणाबाजी केली. मुंबईतील मुंब्रा आणि मदनपुरा भागातही हिजाबच्या समर्थनार्थ महिलांनी आंदोलन केले.
हिजाब परिधान करणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे ,असं सांगत लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं महिलांनी कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला. निलंगा शहरातल्या मुस्लिम महिलांनी एकत्र येत हिसाब बाबत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. हिसाब परिधान करून शाळा-महाविद्यालयात येऊ दिलं गेलं पाहिजे अशी या महिलांची मागणी आहे.
बीडमधील बशीरगंज चौकात एमआयएमकडून हिजाबच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. “पहले हिजाब, फिर किताब” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर मुळे काही काळ बीड मध्ये तणाव असल्याचे पहावयास मिळाले. मात्र काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून माध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर काढण्यात आले आहेत.
सोलापूर एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. हिजाबच्या समर्थानात एमआयएमच्यावतीने आंदोलन करण्यात आलेय. या आंदोलनात मुस्लिम महिलाही मोठ्या प्रमाणात सामील झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हिजाब बंदीबाबत नांदेडमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यानी बजरंग दलाचा निषेध केलाय. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देशात घटनेने सर्वानाच आपल्या धर्माचे पालन करण्याचा मूलभूत हक्क दिला असून त्यावर आक्षेप घेणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या कार्यकर्त्यानी सरकारकडे केली. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा या विद्यार्थी संघटनेने दिला.
सोलापूर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला . 2024 ला देशातील जनता हिजाबचा हिसाब करणार असा इशारा देत सोलापुरात हिजाबच्या समर्थनार्थ महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर प्रहार जनशक्ती संघटनेचा रास्तारोको करण्यात आला.
इतर बातम्या-