Mumbai Goa Highway Second Tunnel in Kashedi Ghat: मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा होत आहे. या महामार्गाचे काम रखडले आहे. गेली अठरा वर्षे झाली या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे गोवा अन् कोकणला जाणारे वाहनधारक संतप्त आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गासाठी डिसेंबर 2024 ची दिलेली डेडलाईन आता हुकली आहे. परंतु त्यातील एक चांगली बातमी आली आहे. या महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.
कशेडी येथील पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील.
मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकेदायक कशेडी घाट आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे केले आहे. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे. या महामार्गावर बोगद्याच्या परिसरात 45 मिनिटांचा असणारा प्रवास 8 मिनिटांत होणार आहे. यामुळे कोकणवासियांचा रस्ते प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
मुंबई-गोवा हा महामार्ग कोकणवासीयांसाठी महत्वाचा आहे. 503 किलोमीटरचा महामार्ग कोकणातून जातो. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर कोकणातील पर्यटन वाढणार आहे. तसेच जेएनपीटीमधील कंटेनरची वाहतूक करणारे भारतामधील सर्वात मोठे बंदर आणि निर्माणाधीन असलेले दिघी बंदर या महामार्गाला जोडली जातात. त्यामुळे व्यापारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. मुंबई कोकणातील असंख्य चाकरमाने राहतात. ते गणपती, होळी किंवा इतर वेळी गावी जात असतात. त्या काळात रेल्वे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रस्ते प्रवास सोयीचा होतो. परंतु महामार्गाचे काम पूर्ण नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. बोगदे पूर्ण होत असले तरी महामार्ग कधी पूर्ण होणार? हा प्रश्न कोकणवासियांना आहे.