राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेचा पोलिसांकडूनही तपास सुरु आहे. अनिल देशमुख यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आपल्या कारवाईची माहिती दिली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. “आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक कशी झाली, यांचं रिक्रिएशन करण्यात आलं. सात ते आठ किलो वजनाचा दगड कारवर पुढच्या काचावर फेकण्यात आला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली तेव्हा अनिल देशमुख समोर तर मागे दोघे बसले होते. पोलिसांचे दोन सुरक्षा रक्षक मागच्या वाहनात होते. घटना घडली तेव्हा वाहनाची गती कमी होती. यावेळी चार जण समोर आले आणि एक मोठ्ठा दगड समोरील काचेवर तर दुसरा दगड बाजूच्या बाजूने (दाराच्या खिडकीतून) फेकून मारण्यात आला. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले होते. अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणी घडलेल्या घटनेसंदर्भात काटोल पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीरपने रस्ता अडविणे, इतराची सुरक्षितता धोक्यात आणने, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे”, अशी प्रतिक्रिया IG दिलीप पाटील भुजबळ यांनी केली.
“फॉरेन्सिक टीमने काल रात्री पासून न्यायवैद्यक पुरावे गोळा करणे सुरू केले आहे. त्या परिसरातील सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्या भागातील मोबाईल टॉवरच्या माध्यमातून त्या काळात त्या परिसरात होत असलेल्या मोबाईल कॉल्सचे अभ्यास केले जात आहे. काटोलमधील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक लावण्यात आली आहे. एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करावे”, असं आवाहन IG दिलीप पाटील भुजबळ यांनी केलं.
“दगडफेकीत तीन टप्पे दिसतात. अनिल देशमुख यांच्या कारचा स्पीड कमी होता. पहिला दगड समोरील काचेवर मारण्यात आला. दुसरा दगड अनिल देशमुख यांच्या बाजूच्या खिडकीतून मारला. तोच दगड कारच्या आतील बाजूस पडला आणि तिसरा दगड बाजूच्या आरशावर मारण्यात आला. ते दगड आम्ही जप्त केले आहेत”, असं दिलीप पाटील भुजबळ म्हणाले.
“अनिल देशमुख यांना नागपूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागात सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस जवान त्यांच्या (अनिल देशमुख ) गाडीत बसणे अपेक्षित होते. मात्र काल घटना घडली तेव्हा अनिल देशमुख यांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस जवान मागच्या गाडीत बसले होते. त्यांच्या या कृतीची चौकशी केली जाणार आहे”, अशी माहिती दिलीप पाटील भुजबळ म्हणाले.