ठाणे : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची (Mahanagar Palika Election) निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील (KDMC election 2021) नेमकं पक्षीय बलाबल काय सांगत, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी (KDMC election 2021) राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता आघाडी कशाप्रकारे तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि मनसे एकत्र लढणार का? हे जाणून घेण्यास नागरिकांना उत्सुकता आहे. आघाडीचा दगाफटका पाचही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केडीएमसीत सध्या 122 प्रभाग आहेत. 11 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. 12 नोव्हेंबरपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रभाग रचना सोडत होणार होती. मात्र त्याआधी 18 गावांविषयी उच्च न्यायालयाचा निकाल आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
केडीएमसीच्या 122 प्रभागांमध्ये सध्या कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा समावेश आहे. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयावर केडीएमसीची प्रभाग रचना ठरणार आहे. दरम्यान, केडीएमसीत गेल्या पाच वर्षात 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजप, 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते.
गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र, आता ही युती नाही. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते.
शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याने सेनेला हिंदूत्ववादी मतांचा फटका बसू शकतो. भाजप आणि मनसेची युती झाली तर भाजपला उत्तर भारतीय मतांचा फटका बसू शकतो. कारण मनसेला उत्तर भारतीयांची मते मिळणार नाहीत. येणाऱ्या काळात किती प्रभाग होतात. त्यानुसार निवडणूक होईल. मात्र कल्याण डोंबिवली शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. यात भाजप आणि मनसे सत्ताबदल करू शकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
संबंधित बातमी : औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?