मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी 2 जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. एक आठवडा होऊनही नव्या मंत्र्याना अद्याप खातेवाटप झालेलं नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अर्थ, महसूल, सहकार, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, फडणवीस यांनी मध्यममार्ग काढून राष्ट्रवादीला अन्य खाती देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, अजित पवार यांना ‘अर्थ’ खाते देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, अजितदादांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाच्या मंत्र्याचा विरोध असून हा विरोध कमी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले आहे असेही या सूत्रांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 10 आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे 10 असे एकूण 20 मंत्री होते. त्यात राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने ही संख्या 29 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा सुरु होती. अखेर, कुणाला कोणते खाते द्यायचे यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे आजच नवीन मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी सांगितले. तसेच, नव्याने खातेवाटप करण्यात येणार असून काही मंत्र्यांची खाती कमी करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खात्यांचा पदभार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशा सहा महत्वाच्या खात्यांचा पदभार समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले ‘अर्थ’ हे महत्वाचे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे असे या सूत्रांनी सांगितले.
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा, ओबीसी, बहुजन विकास
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
अदिती तटकरे – महिला व बालविकास
हसन मुश्रीफ – वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास
संजय बनसोडे – क्रीडा
अनिल पाटील – पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम – आदिवासी कल्याण
या प्रमाणे नवीन मंत्र्यांना खातेवाटप होणार आहे असे या सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय उपक्रमानिमित्त धुळे दौऱ्यावर आहेत. हा शासकीय दौरा संपवून मुख्यमंत्री मुंबईत परत आल्यानंतर खातेवाटपाच्या यादीवर अंतिम मोहोर उमटवली जाईल आणि रात्री ही यादी जाहीर केली जाईल असेही या सूत्रांनी सांगितले.