मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची मुंबई (mumbai) आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या (ed) या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मागणी केली आहे. राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आज केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अतुल शाह या प्रसंगी उपस्थित होते. राऊत यांनी 8 महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे 55 लाख रु. भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी 8 महिन्यांपूर्वी त्यांच्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. त्यानंतर राऊत यांनी ईडीवर आरोप करण्यास सुरुवात केली होती. राऊत यांनी माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे, असं सोमय्या म्हणाले.
राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे 55 लाख रु. भरले तेव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. माझ्याविरुद्ध चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही, असेही त्यांनी सांगितलं.
मालमत्तेवर टाच आल्यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही 2009 साली कष्टातून जागा आणि घर घेतलं होतं. याबाबत कधी कुणी आमची चौकशी केली नाही. कुणी विचारणाही केली नाही. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू, असं संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या: