मुंबई: जून 2019 रोजी तुम्ही दापोली ग्रामपंचायतीला पत्रं लिहून 16,800 स्क्वेअर फूटाचे साई रिसॉर्ट तुमच्या मालकीचे आहे म्हणून सांगितलं. आता तुम्ही मीडियाला सांगत आहात की, तुमचा साई रिसॉर्टशी काही संबंध नाही. मग हा रिसॉर्ट नक्की कुणाच्या मालकीचा आहे? अनिल परब (anil parab) जवाब दो, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. शिवसैनिकांना (shivsena) वाटतं की ईडी गटारीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेली होती. संजय राऊत आणि अनिल परब काय बोलतात याला आता काही महत्त्व नाही. शिवसेनेनेच मुंबई महापालिकेचं गटार केलं आहे. ईडी ग्रामपंचायतीत गेली. 4 तास त्यांनी तपास केला. त्यांच्या हाती अनिल परब यांचं 26 जून 2019चं पत्रं लागलं आहे. त्यातून सर्व काही उघड होणार आहे. त्यामुळे आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही, असं सोमय्या म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
साई रिसॉर्ट आपल्या नावे करण्यासाटी अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला पत्रं लिहिलं होतं. त्यांनी त्याचा टॅक्सही भरला होता. आता तुमच्या नावाचं पत्रं ईडीच्या हाती लागलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेलचे दरवाजे दिसत आहेत का? हे अनिल परब यांनी सांगावं. मी हायकोर्टात पेपर दिले आहेत. जमीन माझी आहे, सगळे कागदपत्र मी कोर्टात दिले आहेत. अनिल परब यांच्या रिसॉर्टसाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत. काय होणार परब?, असा सवाल सोमय्या यांनी केला.
संजय राऊत यांची सव्वा कोटींची संपत्ती जप्त झाली. ज्यांनी एवढी मेहनत केली, लबाडी करण्यासाठी त्यांना किरीट सोमय्या कपटी वाटणारच. राऊत संपादक आहेत. ते शब्दांचा चांगला वापर करतात. मी त्या भानगडीत पडत नाही, असंही ते म्हणाले.
एक एक करून सगळ्यांची चौकशी होणार आहे. मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटू शकतो तर अनिल परबांचा रिसॉर्ट का नाही? केंद्र सरकारने याबाबत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अनिल परब यांच्या मुंबईसह कोकणातील घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. त्यामुळे सोमय्या अधिकच सक्रिय झाले आहेत. अनिल परब यांना या प्रकरणात अटक होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. परब हे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारात फसले आहेत. त्याची शिक्षा त्यांना मिळणारच, असंही सोमय्या म्हणाले होते.