कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील लढत चर्चेत आली आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहू शहाजी छत्रपती यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी मतदार संघातील कानाकोपऱ्यातून समर्थक आले होते. त्यात महिलांचीही संख्या लक्षणीय होती. शाहू छत्रपती यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे २९७ कोटींची संपत्ती आहे.
कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या नावे २९७ कोटींची संपत्ती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या नामनिर्देशन पत्रात त्यांनी या संपत्तीचे विवरण केले आहे. शाहू महाराजांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत १२२ कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या आलिशान वाहनांची किंमत सहा कोटींवर आहे.
शाहू महाराज यांच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही. त्यांच्यावर इतर कोणतेही कर्जसुद्ध नाही. तसेच त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. याच महिन्यात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शाहू छत्रपती आणि महायुतीचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे. संजय मंडलिक यांनी नुकतेच कोल्हापूरच्या गादीवरून वादग्रस्त विधान केले होते. शाहू महाराज छत्रपती हे थेट वारसदार नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. ते दत्तक आलेले आहेत. त्यांच्या या विधानांवर टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली नाही. ते दत्तक आलेले नाही का? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.
संजय मंडलिक २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी त्यांचा ३३ हजार २५९ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक विजयी झाले होते. त्यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. आता संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत रंगणार आहे.