कोल्हापूर: कोल्हापुरातील (kolhapur) गावांच्या हद्द वाढीच्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांवर जोरदार टीका केली. तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल, असं आम्ही गेल्या पाच वर्षात या गावांना अनेकदा सांगितलं. परंतु, या गावांनी ऐकलं नाही. या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी चालते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली की शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्द वाढीची मागणी करतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. हरण्याची स्थिती आल्याने रोज नवी घोषणा चालली आहे. पाच गावांची हद्द वाढ कराच. बघा येतात की नाही अंगावर. हिंमत असेल तर पाच गावांच्या हद्द वाढीची घोषणा कराच, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं आहे.
हद्द वाढ करण्यास गावांचा विरोध असल्याने शेवटी देवेंद्र फडणवीसांनी कंटाळून प्राधिकरण दिलं. कधी तरी ही गावं शहरात येतील, तसेच या प्राधिकरणातून गावांचा विकास होईल या हेतूने फडणवीसांनी प्राधिकरण दिलं होतं. पण दोन वर्षात प्राधिकरणची वाट लावण्यात आली आहे. हद्द वाढही नाही आणि प्राधिकरणाचं काम नाही. हद्दवाढ आजूबाजूच्या गावाला कन्व्हिन्स केल्याशिवाय होत नाही. भाजपच्या जागा 80च्या खाली भाजप जात नसल्याचा रिपोर्ट आहे. त्यामुळे अजितदादांनी पुण्यात आजूबाजूची गावं वाढवली. तरीही भाजपच्याच जागा वाढणार म्हणून रिपोर्ट आला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी कोल्हापुरातील रेल्वेच्या प्रश्नावरही भाष्य केलं. सत्यजित कदम निवडून आल्यावर ते आधी दिल्लीला जातील. घराघरातील सत्कार घेत बसणार नाही. ते दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देतील. आम्ही त्यांना दिल्लीत ऑफिस आणि स्टाफ देऊ. ते रेल्वेचा प्रश्न मार्गी लावतील, असं पाटील म्हणाले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. ही जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. येत्या 12 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या:
कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार?
Nitesh Rane: नितेश राणेंचा 5 लाखांचा गुड बिहेवियर बाँड भरण्यास नकार; नेमकं कारण काय?