राज्यभरात निवडणुकीचा अर्ज भरायला कोणाकडे माणसं जास्त येतात यावरुन जोरदार सामना सर्वत्र पाहायला मिळाला. साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा अशी रस्सीखेच लोकांनी पाहिली. या मतदारसंघातील लढाई रंगतदार आहे. दोन्ही शिंदे एकमेकांविरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी 28 ऑक्टोबरला निवडणुकीचा अर्ज भरला. यात त्यांनी तोबा गर्दी जमवली. या गर्दीची चर्चा कोरेगाव विधानसभेत नव्हे तर सातारा जिल्ह्यात देखील झाली. महेश शिंदे यांचा अर्ज भरायला हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. महेश शिंदे यांनी जमवलेली ही गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी पाहिल्यानंतर, त्यांच्या पेक्षा जास्त गर्दी जमवायची हे कार्यकर्त्यांचं ठरलं.
यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 ऑक्टोबरला शशिकांत शिंदे यांनी देखील आपला अर्ज भरला. यावेळी त्यांनी सुद्धा मोठी गर्दी जमवत हजारो कार्यकर्त्यांसह अर्ज भरला. मात्र हा अर्ज भरायला पाटखळ गावातून सर्वात जास्त गाड्या गेल्या आणि या गाड्या तालुकाध्यक्ष बाबर यांनी नेल्या होत्या. हेच त्यांना पाहावलं नाही. याच गोष्टीचा राग मनात धरुन विरोधकांनी त्यांचा ऊस पेटवून दिला, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. त्यांचा रोख हा थेट महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर होता. पण त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही.
शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपांना महेश शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. “माझ्याबाबत गैरसमज पसरवण्यात येत आहे. हा ऊस आमच्या कार्यकर्त्यांनी जाळलाच नाही. लोकांना आमच्याबाबत खोटं सांगितलं जात आहे. यामुळे मी 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावाच दाखल करतो”, असा इशारा महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना नाव न घेता दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पेटलेल्या ऊसामुळे कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे आता समोरासमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत असून कार्यकर्त्याचा जळालेल्या ऊसाचं सुद्धा राजकारण होवू शकतं. विशेष म्हणजे याबाबतच्या चर्चांना जिल्ह्यात मोठा ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे.