1 January – Bhima-Koregaon Battle : कोरेगाव भीमा शौर्यदीन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या दिनी लाखोंच्या संख्येने विजय स्तभंला अभिवादन करण्यासाठी नागरिक येणार आहे. त्यामुळे संभाजीनगर, नाशिक तसेच मुंबईकडून येणारी वाहतूक 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच वळवण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे यंदा 207 वा शौर्यदिन साजरा होत आहे. परभणी घटनेनंतर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
कोरेगाव भीमा शौर्यदीन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतुकीच काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी भव्य अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. विजय स्तंभाकडे जाण्यासाठी डिग्रजवाडीपर्यंत पीएमपीएल बसेस उपलब्ध असणार आहेत. विजय स्तंभापर्यंत पोहोचण्यासाठी किमान 800 मीटर चालत जावे लागणार आहे. यावर्षी सुमारे दहा ते बारा लाख अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून पोलीस कर्मचारी अधिकारी, एसआरपी तसेच होमगार्ड मिळून जवळजवळ साडेचार हजार बंदोबस्त तैनात असणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी मोठ्या संख्येने अनुयायी येणार आहे. त्यामुळे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात बैठक घेतली. तसेच विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या निमित्ताने पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच पाहणी केली. पार्किंग, वाहतूक नियोजन, विजयस्तंभ परिसर नियोजन, पाणी व्यवस्था, आरोग्य नियोजन, आदी विषयांवर चर्चा केली.
अनुयायींना कोणताही त्रास होवू नये यासाठी पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या होत्या.
1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे अभिवादन दिन साजरा होतो, त्या पार्श्वभूमीवर देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 4500 हजार पोलीस कर्माचारी त्यादिवशी बंदोबस्तासाठी कार्यरत असणार आहेत. सर्व अधिकाऱ्यांच्या या संदर्भात बैठका झाल्या आहेत योग्य सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावर देखील आमची करडी नजर असणार आहे.