कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यात नवा वाद उद्भवला आहे. कुणाल कामराने गायलेल्या एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. यानंतर व्हिडीओनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. या मुद्दावरून विरोधक आणि सत्ताधारी गट आमने-सामने आले. या प्रकरणानंतर कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्याच्या व्हिडीओमुळे त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. आता त्याला कॉपीराईट नोटीस बजावण्यात आली आहे. याबद्दल कुणाल कामराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
कुणाल कामराने केलेल्या व्हिडीओवर त्याला कॉपीराईटची नोटीस बजावण्यात आली आहे. टी-सीरिजद्वारे त्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्याचे गाणेही ब्लॉक करण्यात आले आहे. टी-सीरीजच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कामरा यांनी मूळ कामाचा वापर करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. हक्कांचे उल्लंघन केल्यामुळे ही सामग्री ब्लॉक करण्यात आली आहे. आता यावर कुणाल कामराने ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.
नुकतंच त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटद्वारे कुणालने टी-सीरीजवर नाराजी व्यक्त केली आहे. टी सीरिजने कठपुतली बनू नये, कृपया व्हिडीओ काढून टाकण्यापूर्वी एकदा पाहा, असे कुणालने म्हटले आहेत.
“नमस्कार टी सीरिज कृपया तुम्ही कठपुतली बनू नका. विडंबन आणि व्यंग हे कायदेशीररित्या वाजवी वापराच्या कक्षेत आहे. मी ओरिजनल गाण्याच्या लिरिक्स किंवा म्युझिकचा वापर केलेला नाही. जर तुम्ही हा व्हिडीओ हटवत असाल तर प्रत्येक कव्हर गाणे, नृत्य काढावं लागेल. कृपया क्रिएटर्सने याची नोंद घ्यावी. तसेच हा व्हिडीओ काढून टाकण्यापूर्वी तो डाऊनलोड करुन घ्या”, असे आवाहन कुणाल कामराने चाहत्यांना केले आहे.
Hello @TSeries, stop being a stooge.
Parody & Satire comes under fair use Legally.
I haven’t used the lyrics or the original instrumental of the song.
If you take this video down every cover song/dance video can be taken down.
Creators please take a note of it.Having said… pic.twitter.com/Q8HXl1UhMy
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 26, 2025
दरम्यान, कुणाल कामराने ‘दिल तो पागल है’ या लोकप्रिय चित्रपटातील गाण्याच्या चालीवर एक गाणं बनवलं होतं. यात त्याने एकनाथ शिंदे यांचे नाव घेता टीका केली होती. यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर त्याला अनेक धमक्या देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही यावरून गदारोळ निर्माण झाला होता. आता टी-सीरीजने त्याच्या याच व्हिडीओवर कॉपीराइट स्ट्राइक पाठवल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.