‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटीत काय झाला बदल? आदिती तटकरे यांनी दिले उत्तर

| Updated on: Dec 12, 2024 | 10:15 AM

ladki bahin yojana: सोशल मीडियावर माहिती देताना आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटीत काय झाला बदल? आदिती तटकरे यांनी दिले उत्तर
Follow us on

महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांना भरभरुन यश मिळाले. त्यामुळे महायुतीने २३० आमदारांचा टप्पा गाठला. या योजनेत बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावर येत आहे. त्यासंदर्भात तत्कालीन महायुती सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण केले आहे. या योजनेत कोणताही बदल झालेला नाही? असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

सोशल मीडियावर माहिती देताना आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष

एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मिळत आहे. या योजनेत शासनाकडून पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यामुळे आता महायुतीचे सरकार आल्यामुळे या योजनेची रक्कम २१०० रुपये होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेच्या यशाची कल्पना महाविकास आघाडीला आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु जनतेने महायुतीच्या बाजूनेच आपला कौल दिला.