मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. परंतु योजना जाहीर होऊन चार दिवस झाले तरी पोर्टल अद्याप सुरु झाले नाही. योजनेची घोषणा झाली आहे. मात्र पोर्टल अद्याप बंदच आहे. त्यामुळे योजनेसाठी शासनाकडून पूर्वतयारी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही योजना 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्याळे 1 जुलैपासून पोर्टल सुरू होण अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंदच आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांची गर्दी झाली. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी झाली आहे. महिलांचा रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. तसेच योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार अपडेट्ससाठीचे सर्व्हर स्लो झाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ वर्ष करण्यात आले आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे.
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत), पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, हमीपत्र लागणार आहे.