ladki bahin yojana scheme fraud: राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहीण योजना मास्टर स्ट्रोक ठरत आहे. या योजनेमुळे सरकारच्या लोकप्रियता वाढली आहे. परंतु या योजनेतील गैरव्यवहाराचे एक, एक प्रकार समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांचे फोटो लावून लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलल्याचे लक्षात आले. कन्नड तालुक्यात 12 भावांनी महिलांचे छायाचित्र लावून स्वतःचे अर्ज भरले होते. त्यानंतर साताऱ्यात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 28 अर्ज भरले होते.
आता त्यापेक्षा वेगळा प्रकार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. आधार कार्डवर खाडाखोड करुन लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सीएससी केंद्र चालकांने ही रक्कम परस्पर हडप केली. 71 जणांचे आधार कार्ड वापरत त्याने 3 लाख 19 हजार 500 रूपये मिळवले. नांदेड जिल्ह्यातील मनाठा (ता.हदगाव) येथे हा प्रकार समोर आला.
मनाठा येथील सचिन सीएससी केंद्र चालकाने भन्नाट प्रकार केला. लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरताना त्याने महिलांचा आधार नंबर टाकण्याऐवजी त्यांच्या पतीचा आधार नंबर टाकण्यात आले. रोजगार हमी योजनेचे पैसे आणि इतर योजनेचे पैसे आले आहेत, असे सांगून या त्याने अनेकांचे आधार कार्ड, बँकेचे पास बुक जमा केले. या कागदपत्रांच्या आधारावर लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. मनाठा या गावातील 38 तर बामणी फाटा येतील 33 जणांचा आधार क्रमांक वापरून 3 लाख 19 हजार 500 रुपय परस्पर केंद्र चालकाने उचलले. हा प्रकार अनेकांच्या लक्षात आल्यानंतर या सीएससी केंद्र चालकांचे बिंग फुटले.
लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यावर रोजगार हमी योजनेचे पैसे आले आहेत, असे सांगून त्या व्यक्तीने पुरुषांचे अंगठे घेतले. त्यानंतर बँकेतून ती रक्कम काढून घेतली. यासंदर्भात बोलताना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या गैरव्यवहारात कोण कोण सहभागी आहे, हे चौकशीनंतर समोर येणार आहे. संबंधित केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे केंद्र चालक फरार आहे.