“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण राज्य वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे”, असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी महायुती आणि भाजपवर निशाणा साधला. “आजचा दिवस लातूरकरांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नावावर करून दिला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण होत आहे. त्यांच्या अशा सभा अविस्मरणीय असायच्या. त्यामुळे आजच्या सभेला बघून त्यांची आठवण होते. लातूरला काँग्रेसने घडवले आणि विरोधी पक्ष विचारतो तुम्ही काय केले? लातूरला जिल्ह्याचा दर्जा बॅरिस्टर अंतुले यांनी दिला. विलासराव देशमुख यांची ती मागणी होती. रेल्वे, एअर पोर्ट, बस स्थानक, चौफेर विकास केला”, असं अमित देशमुख म्हणाले.
“सुधाकर शृंगारे यांनी भाजपात काय चालते? याचा पर्दाफाश केला. सामान्य दलित नेतृत्वाचा छळ भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केला. तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि लगेच बोलू लागलात. तुमचा आजवर असंगाशी संग होती, तुम्ही बोललात तुम्ही मन हलके केले. त्यांचे माझे जुने सबंध आहेत. ते वेगळ्या विचाराने लढत होते. आम्ही वेगळ्या विचाराने लढत होतो. पण आम्ही कधी पातळी सोडली नाही. त्यांनी आल्याने आमची ताकद वाढली. तुमचे स्वप्न बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फुट उंच पुतळा उभा करायचं ते महविकास आघाडी पूर्ण करेल. तुमचा जो प्रमाणिक भाव आहे त्याला योग्य सन्मान मिळेल, तुमचे योग्य पुनर्वसन केले जाईल”, असं आश्वासन अमित देशमुख यांनी दिलं.
“काँगेसचे जिल्ह्यातून तीन उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीची बागडौर, दिलीपराव देशमुख यांच्या हातात आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढत आहोत. लातूरचे नाव देशभर रोशन करू. विलासराव देशमुख यांची उणीव दिलीपराव देशमुख भासू देत नाहीत. हा काँग्रेसचा गड दिलीपराव देशमुख यांच्यामुळे आहे. महायुती सरकारचा कारभार लोकांपर्यंत आपणाला घेवून जायचा आहे”, असं अमित देशमुख म्हणाले.
“लातूर मतदारसंघात कोण उभे आहे याचा जास्त विचार करायचा नाही. तुम्ही स्वतः अमित देशमुख आहे असं समजून प्रचाराला लागा. मी अमित देशमुख आहे म्हणजे मी लातूर आहे, मी लातूर आहे म्हणजे महाराष्ट्र आहे, ही संकल्पणा ठेवा. विरोधकांची चर्चा करू नका. कारण ते चर्चेतच नाहीत. आपण आपला विचार घेवून पुढे जायचे आहे. महायुतीत जो भ्रष्टाचार घडतो आहे त्याचा पर्दाफाश करायचा आहे”, असं अमित देशमुख म्हणाले.
“लातूरच्या कोणत्या ठाण्यात फिर्याद द्यायची असेल तर अधिकारी भेटत नाहीत. अगोदर दलालला भेटावे लागते. म्हणून लातूर आपणाला पारदर्शक घडवायचे आहे. काँग्रेसमुळे सामान्य माणसाला कधी धक्का लागला नाही. माणसे जपण्याचे काम काँग्रेसने केले. लातूरला खूप पुढे घेवून जायचे आहे. 2400 कोटी रुपयांच्या योजना आम्ही आतापर्यंत आणल्या. त्याची बेरीज तुम्ही करा. जाहीरनामा लवकरच येईल. लातूरमध्ये खात्रीने सांगतो महायुती इथे टिकणार नाही. गाव, गल्ली सोडू नका. महाविकास आघाडी येईल यासाठी मतदार आपल्या पाठीशी उभे करा. विरोधकांवर अजिबात टीका करू नका, विचारांची लढाई आहे, ती विचारानेच होईल”, असं आवाहन अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केलं.