लातूर-औसा रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आईसह 3 वर्षीय लेकीचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका महिलेसह तिच्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील पाच जणांवर औसा पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरवत हलगर्जीपणाने कार चालवत आई आणि मुलीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही घटना ड्रिंक अँड ड्राईव्हमधून घडली असल्याचा पोलिसांना संशय आहे.
गंभीर जखमी असलेल्या सादिक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पाच जण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांच्याशी साईड देण्यावरून वाद झाला. त्यानंतर ते बाईकवरून आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन पुढे निघून गेले. त्यानंतर कार भरधाव वेगात पाठीमागून आली आणि कारने बाईकवरील कटुंबाला जोराची धडक दिली. ज्यामधे इक्रा शेख आणि नादिया शेख या माय-लेकींचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर सादिक शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी सादिक शेख यांनी गाडीमधील सर्वच जन मद्यधुंद असल्याचे म्हटले आहे. तर या कारमधील जखमी असलेल्या एकाने आमच्या ड्राइव्हरने बाईकला धडक दिली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, बुलढाणा येथे काल झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-मुंबई महामार्गावरील चिखला फाट्यावर काल रात्री ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात पिंपरी खंदारे येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधर, तसेच दत्तात्रय बाळाजी चौधर हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवर बसून बिबीवरून आपले काम आटपून पिंपरी खंदारे जात होते. मात्र मेहकरवरून जालन्याकडे जात असताना चिखल्या फाट्यावर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिलीय. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही जागीच ठार झाले. यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॅफिक मोकळी केली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून फरार झाला होता.