काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचं सुरुवातीपासूनच लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर येत आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. गुन्हे शाखेनं केलेल्या दाव्यानुसार लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबारापूर्वी सातत्यानं आरोपी गुरमैल सिंह, धर्मेंद कश्यप आणि शिवकुमार यांच्या संपर्कात होता. तो सातत्यानं स्नॅपचॅटच्या माध्यमातून आरोपींना सूचना देत होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण दहा आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार आरोपींकडे पोलिसांना मोबाईल आढळून आला आहे. या मोबाईमध्ये सापडलेल्या पुराव्यामधून अनमोल बिश्नोई हा हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचं आणि तो स्नॅपचॅदद्वारे त्यांना सूचना देत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तीन जणांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. हे तीनही आरोपी वेगवेगळ्या वेळी अनमोल बिश्नोईसोबत स्नॅपचॅटवरून संपर्क साधत होते. हा या प्रकरणातील पहिलाच असा पुरावा आहे, ज्यामुळे बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींसोबतच पुण्यातून अटक करण्यात आलेला प्रवीण लोनकर हा देखील अनमोल बिश्नोई याच्या संपर्कात होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानचं निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर देखील फायरिंग करण्यात आलं होतं. या प्रकरणात देखील अनमोल बिश्नोई हा वॉटेंड आहे.अनमोल बिश्नोई याची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपये इनामाची घोषणा करण्यात आली आहे, तसेच त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.