शैलेश पुरोहित, इगतपुरीः 24 तासांत बिबट्याने 2 वेळेस भरवस्तीत शिरकाव केल्याची घटना इगतपुरी शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इगतपुरीत शुक्रवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास मंगेश शिरोळे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून फरफटत नेले. मात्र, हा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी निघून आला. त्याची अवस्था अत्यंत खराब आहे, तर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सुधाकर यादव हे आपल्या शेतातील गोठ्यात म्हशींचे दूध काढून दारात आले असता समोर दारात बिबट्या दिसताच त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी हिम्मत करून हातातील बादली बिबट्याच्या दिशेने भिरकावली व जोरात ओरडायला सुरुवात केली. यामुळे बिबट्याने पळ काढला आणि ते थोडक्यात बचावले. दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली आहे. नागरिकांनी येथे तात्काळ पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
काळुस्तेमध्ये आईने मुलाला वाचवले
इगतपुरी तालुक्यातल्या काळुस्ते गावात मंगळवारी सकाळी सहा वाजता कार्तिक काळू घारे हा सहा वर्षांचा मुलगा आपल्या घरातील अंगणात झोका खेळत होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याला फरफटत नेले. कार्तिकची आई सीताबाई या त्यावेळी अंगणातच भांडे घासत होत्या. त्यांनी जीवाचा थरकाप उडवणारे हे दृष्य पाहिले. धावा, धावा अशा हाका मारत हातात काठी घेऊन बिबट्याचा पाठलाग केला आणि थेट त्याच्यावर चित्त्यासारखी झडप घातली. तेव्हा घराशेजारी असणाऱ्या खड्ड्यात बिबट्या पडला. नेमकी हीच संधी साधत त्यांनी कार्तिकला बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले.
यंदा तिघांनी गमावला जीव
बिबट्याच्या हल्ल्यात यंदा नाशिक जिल्ह्यात तिघांनी जीव गमावला आहे. त्यात दरेवाडी येथील दहा वर्षांचा मुलगा, खेड येथील दहा वर्षांचा मुलगा आणि खैरगाव येथील ऐंशी वर्षांच्या आजीचा समावेश आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्यावर्षी इगतपुरी तालुक्यातल्या आधारवड येथे दहा वर्षांचा मुलगा, पिंपळगाव मोर येथे अकरा वर्षांची मुलगी, कुरुंगवाडीत ऐंशी वर्षांच्या आजीबाई, तर चिंचलखैरे येथे दहा वर्षांचा मुलगा ठार झाला होता. जवळपास चार जण जखमी झाले होते. या काळात दहा बिबट्यांना पकडण्यात आले होते.
दोन वर्षांत 12 जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नाशिकमधील पाच, इगपुरी तालुक्यातील सहा आणि दिंडोरी येथील एकाचा समावेश आहे. तर पेठ येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, वनविभागाने सापडे लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी होत आहे.
इतर बातम्याः
गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यू
‘आयटीआय’ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथे करता येईल अर्ज!
गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यूhttps://t.co/6PYMM7LYD2#Nashik|#Gascylinderexplodes|#sixworkersburnt
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021