मुंबई : ‘हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे’, असं म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वसामान्य जनता खूश होईल यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना फुकट एसटीचा प्रवास. दुसरा महत्त्वाचा आणि लोकप्रिय ठरलेला निर्णय म्हणजे महिलांना एसटी प्रवासासाठी तिकीटात दिलेली 50 टक्के सवलत. याशिवाय हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सारख्या योजना, या योजनांमुळे एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद जरुर मिळाले. पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून पात्र आहेत की अपात्र याबद्दल उद्या सुप्रीम कोर्टात निकाल लागणार आहे. या निमित्ताने आम्ही त्यांचा जीवन प्रवास आपल्याला सांगणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील एक मातब्बर नेते आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हा सांभाळला. साधा रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास होत आहे. शिंदे यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास नुसताच थक्क करणारा नाही, तर अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष.
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.
पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले.
शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. या दरम्यान त्यांनी 20 जुलै 2022 ला बंड पुकारत राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणलं. त्यानंतर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे. ठाणे पालिका, जिल्हापरिषदा, अंबरनाथ नगरपरिषद,
कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिंदे यांनी शिवसेनेचं जाळं विणलं आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत शिंदेंचा शब्द प्रमाण मानला जातो.