मुंबई : “मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो”, असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकतंच म्हणालेत. अब्दुल सत्तार यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण सुप्रीम कोर्टाकडून उद्या 16 अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर निकाल जाहीर होणार आहे. या 16 आमदारांमध्ये अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभेच्या 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमधून तीनवेळा निवडून आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांचा 24,381 मतांनी पराभव केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात नव्हतं. पण त्यांना महाविद्यालयीन काळातच राजकारणाची आवड होती. त्यांनी सिल्लोडमधून बीएचं शिक्षण केलं. त्यानंतर ते 1984 मध्ये अधिकृत आणि औपचारिकपणे राजकारणात आले. त्यांनी 1984 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यानंतर 1990 मध्ये सिल्लोड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर झाले. या नगर परिषदेत सत्तार यांनी आपला ठसा उमटवला. ते 1994 ते 95 च्या काळात नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
अब्दुल सत्तार यांनी 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात अपयश आलं. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली. त्यावेळी ते विजयी झाले नाही. पण सेकंड लीडला होते. अब्दुल सत्तार हे 2001 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांनी 2004 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. पण अवघ्या 301 मतांच्या फरकाने त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते जिंकून आले. तेव्हा ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले होते. त्यानंतर ते 2014 मध्येही निवडून आले. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीआधी ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात ते काही महिने मंत्री होते.
अब्दुल सत्तार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडून आल्यानंतर ते राज्यमंत्रीदेखील होते. ठाकरे सरकार स्थापनेच्या अडीच वर्षानंतर शिंदे गटाने बंड पुकारलं. त्यामध्ये अब्दुल सत्तार यांचाही समावेश होता. याच प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात महासुनावणी होणार आहे.