मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यासाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण सुप्रीम कोर्टात उद्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल लागणार आहे. या 16 आमदारांमध्ये संदीपान भुमरे यांचादेखील समावेश आहे. संदीपान भुमरे हे तब्बल पाचवेळा जिंकून आले आहेत. ते औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. भुमरे यांचा जन्म 13 जुलै 1963 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथे झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालं आहे. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
संदीपान भुमरे यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री होते. तसेच सत्तापालट झाल्यानंतरही त्यांना त्याच विभागाचं मंत्रीपद मिळालंय.
संदीपान भुमरे यांना सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष कारवा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांनी पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम केलं. विशेष म्हणजे ज्या कारखान्यात त्यांनी स्लिप बॉय म्हणून काम केलं, पुढे त्याच कारखान्याचे चेअरमन झाले.
कारखान्यात काम करत असतानाच त्यांनी 1988मध्ये पाचोडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि राजकीय इनिंगला सुरुवात केली. 1989मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांनी पंचायत समितीचे उपसभातीपद मिळवले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1993मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले.
छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार बबनराव वाघचौरे यांनीही बंडखोरी केली होती, त्यामुळे 1995च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची हे शिवसेनेत ठरत नव्हते. शिवसेनेचे नेते, दिवंगत मोरेश्वर सावे हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांच्या नावाला विरोध होत होता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 1999 आणि 2004 निवडणूकही जिंकली. संपूर्ण पैठण तालुका त्यांनी शिवसेनामय केला.
सलग तीनवेळा निवडून आल्यानंतर भुमरे यांचा विजयी रथ राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांनी रोखला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत वाघचौरे विजयी झाले आणि भुमरे यांना पाच वर्षे घरी बसावं लागलं. मात्र, याकाळात भुमरे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला आणि पुढे 2014 आणि 2019ची निवडणूक सहजपणे जिंकली.
भुमरे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा 14 हजार 139 मतांनी पराभव केला होता.