नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यात वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला. 10 शेळ्यांचा मृत्यू झाला, तर माय-लेकीसह एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे.
त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या. दरम्यान, येत्या चार दिवसांत उत्तर महाराष्ट्रात वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरपासून पाऊस राम राम घेण्याच्या तयारीत आहे. या काळात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेनुसार 6 ते 9 ऑक्टोबरच्या काळात उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.
इतर बातम्याः
व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना अमानुष मारहाण; कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातली संतापजनक घटना
Video : लखीमपूरपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, फडणवीसांचा माविआ नेत्यांना सल्ला@Dev_Fadnavis @Jayant_R_Patil @OfficeofUT @PawarSpeaks #devendrafadanvis #jayantpatil #lakhimpurcase #maharashtraband #farmersjustice pic.twitter.com/6tXW66CSeB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021