नाशिक : सुरुवातीपासून राजकीय घडामोडींमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. अपक्ष उमेदवारी, कॉंग्रेस कडून निलंबन आणि त्यानंतर अखेरचा विजय हा प्रवास संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिला. पण त्यानंतर सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी घडविलेल्या इतिहासची चर्चा होऊ लागली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मिळवलेला विजय त्यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच आहे. सत्यजित तांबे यांचाही विजय अपक्ष म्हणूनच झाल्याने थोरात आणि तांबे यांच्या इतिहासाची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
सत्यजित तांबे हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकीय क्षेत्रातच आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचीही विधानपरिषद किंवा विधानसभा येथे जाण्याची अनेक दिवसांपासून इच्छा लपून राहिलेली नाही.
नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे आणि मामा बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विशेषतः आमदार होण्याची सुरुवात ही अपक्ष म्हणूनच झाली आहे.
सत्यजित तांबे यांचे वडील हे यापूर्वी तीनदा आमदार झाले आहे. त्यामध्ये पहिल्या वेळेस कॉंग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून विजय मिळवला होता आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचं संपूर्ण कुटुंब कॉंग्रेसमध्ये होतं. स्वातंत्र्य काळातही थोरात कुटुंब काम करण्यात आघाडीवर होते, तरीही बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेस तिकीट नाकारले होते.
त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर ते सलग आजपर्यंत आमदार आहे.
सत्यजित यांचे वडील आणि मामा यांच्या प्रमाणेच त्यांनीही स्वतः अपक्ष उमेदवारी करत विजय संपादन करत इतिहास घडवून आणला आहे. त्यामुळे संगमनेरसह संपूर्ण राज्यात भाच्याने मामाच्या आणि वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं अशी चर्चा सुरू झाली.
सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी ती घेतली नाही असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला होता, तर सत्यजित तांबे यांनी मला कॉंग्रेस एबी फॉर्मच दिला नाही असा दावा केला होता.
सुरुवातीपासून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून नाशिक मतदार संघाची निवडणूक चर्चेत राहिली. त्यात सत्यजित तांबे यांनी विजय मिळवून इतिहास घडविल्याने अधिकच चर्चा होत आहे.