महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात ढवळून निघणार आहे. कारण आगामी काळात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. पण या निवडणुकीचं बिगूल वाजण्यापूर्वी लोकपोल संस्थेचा ओपिनियन पोल समोर आला आहे. लोकपोल संस्थेने केलेल्या सर्व्हेत थेट आकडेवारी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 115 जागांवरच थांबणार असल्याचा दावा लोकपोल सर्व्हेतून करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 141 ते 154 जागा मिळणार असल्याचं लोकपोलच्या सर्व्हेत म्हटलं आहे. लोकपोल संस्थेने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये मविआला बहुमत दिसत आहे. लोकपोलच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहे.
लोकपोलच्या सर्व्हेनुसार, महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीला एकूण मतांच्या 38 ते 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच मविआला एकूण मतांच्या 41 ते 44 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, असं लोकपोलच्या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी याच संदर्भात आणखी एक वेगळा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्याचा आणि लोकपोलच्या सर्व्हेचा संबंध नाही. पण रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेचा उल्लेख केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील याबाबत सूचक ट्विट केलं आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ शकते. या अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात भीती पसरल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवार गटाला रोखण्यासाठी अजित दादांना भाजपकडून खास ऑफर देण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याबाबत रोहित पवारांनी थेट आकडेच सांगितले आहेत.
“एका internal source च्या माहितीनुसार, परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत”, असा दावा रोहित पवार यांनी केला.
“भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय”, असं रोहित पवार म्हणाले.
“कर्जत जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे”, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.