लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. तर निवडणुकीच्या या धामधुमीत आयाराम आणि गयारामांचीही चलती सुरू आहे. मात्र, हे सुरू असतानाच धाराशीवमध्ये अत्यंत वेगळी घटना घडली आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशीवमध्ये आले होते. यावेळी चक्क भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राजकारणात नेमकं काय घडतंय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशीव शहरात आले होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. प्रचार रॅलीसाठी उद्धव ठाकरे आले होते. मात्र, या स्वागतामध्ये एका नेत्याने उद्धव ठाकरे यांचं स्वागत केल्याने सर्वांचेच कान टवकारले आहे. भाजपचे तुळजापूरचे नेते देवानंद रोचकरी यांनी तुळजाभवानी मातेच्या कवड्याची माळ घालून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धाराशीव येथील सभेपूर्वीच हा प्रकार घडल्याने भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीत एकच खळबळ उडाली आहे. रोचकरी हे ओमराजे यांचा प्रचार करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा ही विधानसभेची रंगीत तालीम आहे. जनतेला माहिती आहे, पक्ष फोडले, ईडी नोटीसा दिल्या. आता सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनतेचे न्यायालय मोठे आहे. लोक न्याय करतील. स्वच्छ होण्यासाठी शिंदे गट आहे का? अजित पवार यांच्यावर मोदी यांनी स्वतः 70 हजार कोटी रुपयांचा आरोप केला. नंतर ते त्यांच्यासोबत आले. आणीबाणी पेक्षा जास्त वाईट स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली.
संविधानाला मारक राजकारण झालं. पक्ष चिन्ह हिरावून घेतला. उद्धव ठाकरे, शरद पवार याचा पक्ष काढून घेतला. सामान्य लोकांमध्ये चीड आहे. त्यावर लोक या निवडणूकrत व्यक्त होतील. ईडी, सीबीआय वापर केला गेला. वर्षा सोडताना उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात आसवे आली होती, असंही त्यांनी सांगितलं.