पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. या भाषणाची चर्चा चांगलीच रंगली. त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. परंतु एकनाथ शिंदे यांनी हिंदीतून भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांना जनता स्वप्नातही पंतप्रधान करणार नाही, असा टोला त्यांनी लागवला.
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, विश्वासाच दुसरे नाव नरेंद्र मोदी आहे. त्यांनी देशातील 32 करोड लोकांना गरीबी रेषेच्या वर काढले आहे. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा देत गरीबांना हटवले. ही नांदेड आणि हिंगोलीची निवडणूक नाही. तर देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची गँरटी महाराष्ट्राची आहे. विश्वासाच दुसरं नाव मोदी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव पत्कारला आहे. या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमदेवार आपआपसात निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार? ही लोक एकत्र लढवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कामानंतर मोदी सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करणे, ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. मराठवाड्याचा विकास करणे ही मोदी यांची गॅरंटी आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आता मोदीची गॅरंटी आहे. भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. देशातील लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.