राज्यातील राजकारणात 2019 मधील शपथविधीची चर्चा अजूनही जात नाही. या शपथविधीबाबत सर्वात प्रथम ‘टीव्ही ९ मराठी’च्या व्यासपीठावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी राज्यातील राजकारणात भूकंप झाला होता. त्या शपथविधीच्या निर्णयास शरद पवार यांची संमती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले होते की, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याचा हालचाली झाल्या. त्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बोलणी करत होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून आम्हाला युतीचा प्रस्ताव आला होता. याबाबत थेट शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतरच सगळ्या गोष्टी ठरल्या, असा दावा फडणवीस यांनी केला होता. आता या विषयावर अजित पवार यांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्या शपथविधीपूर्वी अजित पवार यांना भाजपशी चर्चा करण्याचे शरद पवार यांनी सांगितल्याचे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, २०१९ मध्ये भाजपशी चर्चा करण्यास अजित पवार यांना सांगितले होते. परंतु त्यांना निर्णय घेण्यास सांगितले नव्हते. चर्चा करुन शपथविधी घ्या, असे सांगितले नव्हते. प्रत्येक पक्षात अशी चर्चा करण्याचे अधिकार ठरविक नेत्याकडे दिले जातो. त्यानुसार राष्ट्रवादीत हा अधिकार अजित पवार यांना दिला होता. ही चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष घेत असतात. यामुळे त्या वेळचा निर्णय पवार साहेबांचा नव्हता. तो निर्णय जर शरद पवार साहेबांचा असता तर त्यांनी ते सरकार पडू दिले नसते. साहेबांनी म्हटले असते ठीक आहे, झाले ते झाले, आता पुढे जाऊ या. यामुळे नक्कीच तो निर्णय शरद पवार यांचा नव्हता.
अजित पवार यांची सहा महिन्यांपूर्वीची वक्तव्य पाहा. त्यावेळी ते सुप्रिया सुळे यांचे कौतूक करत होते. आता तुमची बदललेली वाक्य मोबाईलवर फिरत आहेत. सहा महिन्यांमध्ये तुमच्यात झालेला हा बदल लोकांना कळत आहे. लोक सृज्ञ आहेत. ते योग्य निर्णय घेतील. परंतु एक नक्की सांगतो बारामतीकर शरद पवारांचा पाठिशी आहेत. गेली ६० वर्षे ते पवार साहेबांसोबत आहे. ते तुम्हाला दिसून येईल. आधी अजितदादाच म्हणायचे पक्ष सोडल्यावर नारायण राणे यांचे काय झाले. त्यांना एका बाईने पडले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता स्वच्छ चारित्र्य असलेल्या लोकांचा पक्ष झाला आहे. या पक्षातील कोणत्या नेत्यावर आरोप नाही. ज्यांच्यावर आरोप होते, ते तिकडे गेले. आता पक्षात स्वच्छ चारित्र्याची लोक राहिली आहे. निवडणुकीत आम्ही आताच प्रचार करत नाही. यापूर्वी प्रचार करत होतो. आमचे गावात आणि मतदार संघात सामाजिक संबंध आहेत. अनेक मित्र आहेत. त्यांच्यापर्यंत आम्ही जात असतो, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.