लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप निश्चित नव्हते. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बुधवारी रात्री पुन्हा बैठकीचे एक सत्र झाले. त्यात वाद असणाऱ्या सर्व जागांचा निकाल लावण्यात आला. या बैठकीत नाशिकची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वाधिक चर्चेत असणारी ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यास तिन्ही पक्षांचे एकमत झाले. पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहे. परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरूच आहे. यासंदर्भात आज मंत्री उदय सामंत यांनी बैठक बोलवली आहे. संभाजीनगरची जागा शिवसेनेकडेच जाणार आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवरून तिढा संपल्याची बातमी बुधवारी आली होती. किरण सावंत यांनी सोशल मीडियातून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. परंतु उदय सामंत यांचा कोकणातील जागेसाठी आग्रह कायम आहे. कोकणात शिवसेनेचे प्राबल्य कायम राखण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा महत्वाची आहे. आता भाजप आणि शिवसेनेत राजकीय युद्धाला जोर आला आहे.
शिवसेनेतून राजश्री पाटील यांच्या उमेदवारीला वाशिममध्ये विरोध सुरु आहे. वाशिममध्ये भावना गवळी यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शने करत घोषणा दिल्या. पाच टर्मपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच नेतृत्व करणाऱ्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी दिली नसल्याने कार्यकर्त्यांचा रोष आहे. राजश्री पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या वाशिम जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांनी टीका केली आहे. भावना गवळी यांच्यावर अन्याय होत आहे, असाही आरोप त्यांनी केला.
आपला उमेदवार कोण आहे, हे जाणून घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमदेवार असल्याचे समजून सर्वांनी निवडणूक लढा, अशा सूचना महायुतीच्या नेत्यांनी ठाण्यातील पहिल्या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. एकंदरीत महायुतीचा प्रचार आता जोरात सुरु झाला आहे.