लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. जास्त रक्कम घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आता पुणे आणि नागपूरमध्ये भरारी पथकाने लाखोंची रोकड जप्त केली आहे. पुणे जिल्ह्यात ६५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी फॉरच्यूनर गाडीची तपासणी केली. त्यावेळी त्यात १३ लाख ९० हजार ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्या. दुसऱ्या घटनेत शिरुर पोलिसांनी शहरातील कमान पुलाजवळ ही कारवाई केली. या ठिकाणी एका खासगी वाहनातून ५१ लाख १६ हजार रुपये जप्त केले. एकूण ६५ लाखांची रक्कम जप्त करुन ती कोषागारात ठेवण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
पुण्याप्रमाणे नागपूरमध्ये पथकाने रोकड जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी आणि नागपूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या पथकाने एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नागपूर चंद्रपूर महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम कोणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. संपूर्ण रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? हे सुद्धा तपासल्या जात आहे
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे पथक सज्ज झाले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवर या नियंत्रण पथकाचे लक्ष आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या तसेच संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या महाराष्ट्र गुजरात सीमेवर तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर तीन पथक तैनात करण्यात आले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने गुजरात आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहन तसेच इतर प्रवासी वाहन यांची पोलीस आणि स्थिर नियंत्रण पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात मतदारांना मतदानासाठी मद्य तसेच पैशाचे आमिष दाखवले जाते. याला आळा बसावा याकरिता निवडणूक आयोगामार्फत कठोर अशी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी सीमावर्ती भागांमध्ये स्थिर नियंत्रण पथक आणि पोलिसांमार्फत करडी नजर ठेवण्यात आली आहे.