मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचं अधिकृत जागावाटप जाहीर झालं नसलं तरी काही लढती जवळपास निश्चित झाल्यात. जवळपास निश्चित लढत क्र.1 रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात मानली जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांच्या विरोधात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेच भाजपचे उमेदवार असतील, अशी माहिती आहे. त्यासाठीच राणेंची राज्यसभेची खासदारकीची टर्म संपल्यावरही त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली नाही. 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून खासदार झाले आहेत. दोन्ही वेळा त्यांनी राणेंचे पूत्र निलेश राणे यांना पराभूत केलंय.
2014 मध्ये काँग्रेसकडून उभं राहिलेल्या निलेश राणेंचा 1 लाख 50 हजार मतानं आणि 2019 मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे उभे होते. त्यावेळी विनायक राऊतांनी त्यांचा 1 लाख 78 हजार मतांनी पराभूत केलं.
युतीत ही जागा शिवसेनेसाठी सुटलेली आहे. पण आता शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपचा राणेंसाठी या जागेवर दावा आहे. जवळपास निश्चित लढत क्र. 2 बारामती, सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार यांच्यात असणार आहे. जवळपास निश्चित असलेली दुसरी लढत म्हणजे ही बारामतीची. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच उभ्या राहू शकतात. तसे संकेत त्यांनी बारामतीच्या भाषणातून दिलेत. बारामतीकर मलाही संधी देतील, अशी आशा आहे, असं वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलंय.
सुप्रिया सुळे 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा खासदार झाल्या आहेत. 2009 मध्ये सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांता कलावडेंचा 2 लाख 46 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये एनडीएनं पाठींबा दिलेल्या रासपच्या महादेव जानकरांना 69 हजार मतांनी पराभूत केलं. तर 2019मध्ये भाजपच्या कांचन कुल यांना 1 लाख 55 हजार मतांनी पराभूत करुन हॅटट्रिक साधली.
तिसरी निश्चित लढत मानली जातेय दक्षिण मुंबईतली… दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे, खासदार अरविंद सावंत आहेत आणि याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुलाबा विधानसभेचे आमदार भाजपचे राहुल नार्वेकर आहेत. त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रचार सुरु केल्याचंही बोललं जातंय. नार्वेकरांनी वरळीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरु केल्यात. आणि इथल्या नागरिकांशीही चर्चा केली. वरळीतून आदित्य ठाकरे आमदार असून दक्षिण मुंबई लोकसभेतच हा मतदारसंघ येतो.
2019 मध्ये भाजप शिवसेना युतीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती. त्यावेळी अरविंद सावंतांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा 1 लाख 67 हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला. मिलिंद देवरांना 3 लाख 21 हजार मतं मिळाली होती. पण आता हेच मिलिंद देवरा शिंदे गटात आलेत आणि राज्यसभेचे खासदार झालेत. त्यामुळे भाजपने इथं राहुल नार्वेकरांना तिकीट दिल्यास अरविंद सावंतांच्या विरोधात काट्याची टक्कर असेल.
चौथी लढत जी निश्चित समजली जातेय, तीही आहे पुण्याची. पुण्यातून भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी निश्चित मानले जातेय. तर त्यांच्या विरोधात पुण्यातले कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर उभे राहू शकतात. 2019मध्ये पुण्यातून काँग्रेसच्या मोहन जोशींचा पराभव करुन भाजपचे गिरीश बापट तब्बल 3 लाख 24 हजार मतांनी विजयी झाले होते. बापटांच्या निधनानंतर ही जागा अजूनही रिक्तच आहे. गेल्या वर्षीच पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा 11 हजार मतांनी पराभव केला. आणि तब्बल 28 वर्षांनी कसब्यात भाजपचा पराभव झाला. तर मुरलीधर मोहोळ 2 वेळा नगरसेवक राहिले असून महापौरपदही सांभाळलं, जनसंपर्क आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा, उदयनराजे इच्छुक आहेत. ते सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. पण आपणही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून उदयनराजेंनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा 1 लाख 26 हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला. मात्र 6 महिन्यात उदयनराजे राजीनामा देऊन भाजपात आले, आणि पोटनिवडणुकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना 87 हजार मतांनी पराभूत केलं. अर्थात ही जागा महायुतीत कोणाला सुटणार हे पाहणं महत्वाचं असेल. कारण या जागेवर अजित पवार गटाचाही दावा असल्याचं बोललं जातंय. अजित पवार गटाचे आमदार मकंरद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील आणि शिंदे गटाचेही साताऱ्याचे नेते पुरुषोत्तम जाधव इच्छुक आहेत. म्हणजेच साताऱ्यात लोकसभेसाठी 3-3 नेते इच्छुक आहेत.