Loksabha election 2024 : छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरुन ठाकरे गटात 2 दिग्गज आमनेसामने आले आहेत. या जागेवर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघेही इच्छुक आहेत. तर दानवेंनी खैरेंवर डावलण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात उमेदवारीवरुन चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे आमने-सामने आले आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खैरे आणि दानवे दोघांनीही दावा केलाय. आता तर खैरेंनी आतापर्यंत डावलण्याचंच काम केलं असा आरोप दानवेंनी केला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, 10 वर्षांपासून मी इच्छुक आहे. परंतु खैरेंनी डावलण्याचंच काम केलं. खैरेंसाठी नाही उद्धव ठाकरेंसाठी काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. यावर खैरेंनी देखील उत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेता मोठं पद आहे. पक्ष, मी डावललं असतं तर इथंपर्यंत आलेच नसते.
शुक्रवारी मातोश्रीवरही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दानवे आणि खैरेंसोबत बैठक झाली. पण अद्याप तिकीटावर शिक्कामोर्तब झालेले नाही. तर अंबादास दानवे माझा शिष्यच आहे आणि गुरु काही तरी हातचं राखून ठेवतो असं खैरे म्हणाले आहेत. मात्र दानवेंनी खैरेंना गुरु मानण्यास नकार दिला आहे. माझे गुरु शिवसेना प्रमुख बाकी कोणी नाही असं दानवे म्हणालेत.
चंद्रकात खैरे संभाजीनगरमधून 4 टर्मचे खासदार राहिलेले आहेत. मात्र 2019 मध्ये खैरेंचा मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. इथं खैरेंचा विजय रथ MIMच्या इम्तियाज जलील यांनी रोखला.
चंद्रकांत खैरे यांना 3 लाख 84 हजार 550 मतं मिळाली होती. इम्तियाज जलिल यांना 3 लाख 89 हजार 42 मतं मिळाली होती.अवघ्या 4 हजार 492 मतांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी फिल्डिंग लावलीये. पण त्यांच्यासमोर आता त्यांच्याच पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उभे ठाकले आहेत. तर मीच खासदार होणार असं खैरे म्हणतायंत.
शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरसाटांनी सस्पेंस वाढवला आहे सोमवारपर्यंत आमचाही संभाजीनगरचा उमेदवार कळेल असं शिरसाट म्हणाले आहेत. तर आपण ठाकरेंना सोडून जाणार नाही असं दानवे म्हणाले आहेत.
शिंदेंच्या बंडानंतरही खैरे शिंदे गटात गेले नाहीत. एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून खैरेंची ओळख आहे. त्यामुळं तूर्तास तरी खैरे दानवेंच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार हे 2 दिवसांत स्पष्ट होईल.