महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, सूत्रांची माहिती, वाचा इनसाईड स्टोरी

| Updated on: Sep 20, 2024 | 10:06 PM

महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ नेत्यांमध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरु आहे. मविआ नेत्यांच्या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे.

महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, सूत्रांची माहिती, वाचा इनसाईड स्टोरी
महाविकास आघाडी
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी महाविकास आघाडीची जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण जवळपास 80 टक्के जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासाठी गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे याआधीदेखील मविआ नेत्यांची जागावाटपासाठी चर्चा पार पडली आहे. पण दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बैठका या जागावाटपाबाबत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभेच्या अनेक जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची आतापर्यंत 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. मविआ नेते तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा करणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

तिढा असलेल्या जागांचा प्रश्न कसा सुटणार?

जागावाटपात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष ज्या जागा जिंकला, त्या जागा त्याच पक्षाला देण्याचा प्रयत्न आहे. जिंकलेल्या जागांमध्ये 10 ते 20 टक्के बदल केला जाणार आहे. मविआच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, तिढा असलेल्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद जाणून हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानुसार मेटीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठका होत आहेत. तीनही पक्षांच्या मनात एकच आहे, जिंकून येणं हा फॉर्म्युला ठेवूयात. पक्ष कोण, उमेदवार कोण हा फॉर्म्युला नाही. काही जागांमध्ये आदलाबदल केली जाऊ शकते”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जागावाटपावर प्रतिक्रिया दिली. “ज्या जागांवर तीनही पक्ष दावा करत आहेत त्या ठिकाणी सर्व्हे करुन रेटिंग केलं जाऊ शकतं का? असा आम्ही प्रयत्न करु”, असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.