महाराष्ट्राच्या राजकारणातील आतली बातमी, आचारसंहिता तोंडावर असताना मविआ आणि महायुतीचं जागावाटपाबाबत काय ठरलं?

| Updated on: Sep 18, 2024 | 7:04 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. मविआ आणि महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आतली बातमी, आचारसंहिता तोंडावर असताना मविआ आणि महायुतीचं जागावाटपाबाबत काय ठरलं?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

महाविकास आघाडीची जागावाटपासाठी बैठक सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या बैठकीसाठी उपस्थित आहेत. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये मविआची ही बैठक पार पडत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजपासून सलग तीन दिवस जागावाटपासाठी बैठका पार पडणार आहे. त्यातील पहिली बैठक ही बीकेसी येथील सोफीटेल हॉटेलमध्ये पार पडत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी याआधी तीन बैठका पार पडल्या होत्या. मुंबईच्या जागावाटपाचा पेच सुटला असल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती. यानंतर महाराष्ट्रातील जागावाटप कशा पद्धतीने असावं याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, महायुतीतल्या अनेक नेत्यांकडून वक्तव्य केलं जात आहे की, येत्या 15 ते 20 दिवसांत महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे त्याआधी महाविकास आघाडीचं जागावाटप होणं अपेक्षित आहे. दरम्यान, सध्याचं जागावाटप ठरल्यानंतर अंतिम निर्णय हा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता तोंडावर आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेसचं हाय कमांड जागावाटपाबाबत काय निर्णय घेतात? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

महायुतीचं जागावाटप महिना अखेरपर्यंत पूर्ण होणार?

एकीकडे महाविकास आघाडीच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार घडामोडी घडत आहेत तर दुसरीकडे महायुतीतही जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीची जागावाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोडवला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्या आहेत. ज्या कॉमन जागांवर आग्रह आहे, अशा जागांबाबत चर्चाही झाली. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत अशा जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

महायुतीतील तीनही पक्ष ज्या जागांवर आग्रही आहेत, अशा वाद असेलेल्या जागांबाबत दिल्लीत अमित शाह यांच्याकडे बैठक घेऊन तोडगा काढला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांबाबत अमित शाहांनी बैठक घेऊन तिढा सोडवलेला होता. त्याचप्रमाणे यावेळी देखील अमित शाह यांच्याकडे तिढा सोडवला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.