निखिल चव्हाण, Tv9 मराठी, परभणी : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. जुलै महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. नंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत गेल्या आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून राज्यातील राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपला पक्ष वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांना सोबत राहण्याचं आवाहन करत आहेत. तसेच शिंदे गटाविरोधात खमकेपणाने सामना करायचं आवाहन ते त्यांच्या शिवसैनिकांना करत आहेत. पण तरीही पक्षातील अनेक पदाधिकारी, आमदार-खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवत एकनाथ शिंदे यांचा हात धरलाय. एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे पाठोपाठ नाशिकमध्येही आपलं वर्चस्व भक्कम करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. त्यानंतर आता शिंदे परभणीत (Parbhani) ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे फक्त उद्धव ठाकरेच नाही, तर यावेळी संपूर्ण महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) दणका देण्याचा निश्चय शिंदेंनी केल्याचं चित्र आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने परभणीत जबरदस्त कामगिरी केलीय. परभणीतील महाविकास आघाडीचे स्थानिक पातळीवरचे मातब्बर नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. विशेष म्हणजे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
परभणी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सभापती आणि सदस्य हे शिंदे गटात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
विशेष म्हणजे अमरावतीमधूनही नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली होती. भाजप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भिडणाऱ्या अमरावतीमधील (Amravati) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाघिण आणि फायरब्रँड नेत्या वर्षा भोयर (Varsha Bhoyar) नाराज असल्याची माहिती समोर आली होती. वर्षा भोयर नाराज असल्याने आतून खचल्या आहेत. त्यामुळे त्या उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे वर्षा भोयर यांनी आपल्या नाराजी विषयी माहिती सांगणारा एक व्हिडीओ देखील जारी केलाय. याशिवाय त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर आपली नाराजी स्पष्ट करत काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सूचित केलंय. वर्षा भोयर या उद्धव ठाकरे यांच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला तर हा ठाकरे गटासाठी खूप मोठा झटका असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे वर्षा भोयर यांची मनधरणी करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.