मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्ष आणि घटकांची आज पुन्हा एकदा एकत्रित बैठक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या विषयी सविस्तर माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सीमावादावरुन भाजपवर निशाणा साधला.
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे? कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य हे हिंदुस्तान-पाकिस्तान आहेत का?”, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
“महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष आणि वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित आहेत. 5 डिसेंबरला इथे पत्रकार परिषद झाली होती. 7 डिसेंबरला महामोर्चाबद्दल चर्चा करण्याचं ठरलं होतं. त्यानुसार चर्चा झाली”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“आजच्या बैठकीचा हेतू अजित पवारांनी सांगितला आहे. परवाची बैठक ही धावपळीची झाली आणि आम्ही मोजकेच लोकं उपस्थित होतो. आज मात्र महाविकास आघाडीचे सर्व घटक, मित्रपक्ष उपस्थित आहेत. 17 डिसेंबरला महाराद्रोहींविरोधात हल्लाबोल करण्यासाठी प्रचंड, अतिविराट मोर्चा निघणार आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
“या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यान पासून होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या मोर्चाची सांगता होईल”, अशी माहिती ठाकरेंनी दिली.
“मला खात्री आहे, हा मोर्चा न भूतो, न भविष्य असा होणार आहे. कारण महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जातोय आणि अहवेलना केली जातेय. महाराष्ट्राचं जणूकाही अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. त्याही विषयी आम्ही मोर्चाच्या वेळी बोलणार आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“सीमाभागातील गावांवर आजूबाजूची गावं हक्क सांगायला लागली आहेत. मुंबईत सुद्धा, तिच्यावर कसा घाला घातला जातोय, यावरही भाष्य केलं जाणार आहे”, असंही ते म्हणाले.
“महाराष्ट्रातून उद्योग पळवले गेले. मी निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिलीय. गेल्यावेळी दिल्ली महापालिका, हिमाचल आणि गुजरात या तिन्ही ठिकाणी भाजप जिंकला होता. पण यावेळी दिल्ली महापालिका आप जिंकला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकलेली आहे आणि गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवलंय. या यशाबद्दल आम्ही अभिनंदन करतोच आहोत. गुजरातच्या विजयामागे महाराष्ट्राचे उद्योग पळवल्याचं सुद्धा योगदान आहे हे कुणी विसरु नये. एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडायचा”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“गुजरात निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग पळवले. आता कर्नाटकातील निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील गावं तोडतील की काय? अशी आम्हाला भीती वाटतेय. म्हणूनच वेळेत या महाराष्ट्रद्रोहींना आवरलं नाही तर ते महाराष्ट्र छिन्नविछिन्न केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या मनात असणारं विष जगजाहीर होत आहे. महाराष्ट्रप्रेम हे समान धागा ठेवून आम्ही सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो”, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.