महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ, फॉर्म्युला सांगताना मविआ नेत्यांचं अंकगणितच चुकलं

| Updated on: Oct 23, 2024 | 8:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत प्रत्येक पक्षाला 85 जागा देण्याबाबतचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती देण्यात आली. पण यावेळी एकूण जो आकडा सांगण्यात आला त्यामध्येच घोळ असल्याचं समोर आलं आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ, फॉर्म्युला सांगताना मविआ नेत्यांचं अंकगणितच चुकलं
महाविकास आघाडी
Follow us on

महाविकास आघाडीचा 85-85-85 चा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आतापर्यंत 255 जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे. मित्र पक्षांना काही जागा देण्याचं ठरलं आहे. तर इतर जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे. उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत प्रत्येक पक्षाला 85 जागा देण्याबाबतचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती देण्यात आली. तसेच उर्वरित जागांबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असंही सांगण्यात आलं. असं असलं तरी महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही हे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही. ठाकरे गटाकडून आज 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण असं असलं तरीही महाविकास आघाडीत जागावाटपाचा पूर्ण तिढा सुटताना दिसत नाही. विशेष म्हणजे आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासाठी बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात एवढे सगळे नेते उपस्थित होते. पण या बैठकीतही जागावाटपाचा तिढा सुटला नाही.

महाविकास आघाडीत अजूनही 33 जागांचा तिढा?

या बैठकीनंतर नाना पाटोले यांनी 85-85-85 असा 270 जागांचा फॉर्म्युला ठरला असून उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना देणार असल्याचं सांगितलं. पण 85-85-85 चा फॉर्म्युला ठरला असेल तर या सर्वांची बेरीज केवळ 255 होते. मग नाना पटोले यांनी 270 जागा का सांगितल्या असाव्यात? असा प्रश्न उपस्थित होतोय. याचाच अर्थ महाविकास आघाडीत अजूनही 33 जागांचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीच्या पुढच्या दोन दिवसात पुन्हा बैठका होणार आहेत. त्या बैठकांमध्ये मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल, अशी आशा बाळगली जात आहे.

दरम्यान, याआधी काँग्रेस 125 आणि ठाकरे गट 100 जागांवर आग्रही होते. पण आता चर्चा आणि वादानंतर काँग्रेस 100 जागांपेक्षा जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर ठाकरे गट 100 जागांच्या आसपासचा आकडा गाठण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.