राज्यात महाविकास आघाडीकडून सर्व ४८ जागांचे वाटप जाहीर झाले आहे. परंतु सांगलीमधील जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत सुरु असलेला वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. सांगलीत महाविकास आघाडीच्या आघाडी धर्माला सुरुंग लागणार आहे. सांगलीतून सुरु झालेले बंडखोरीचे ग्रहण राज्यभर पसरण्याची भीती आहे. सांगलीत सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली. सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी अपक्ष बरोबरच दुसरा अर्ज काँग्रेस पक्षातर्फेही दाखल करणार आहे.
सांगलीत काँग्रेस भवन समोर मेळाव्याच्या निमित्ताने विशाल पाटील शक्तिप्रदर्शन करणार आहेत. गणपती मंदिरासमोरून पदयात्रा काढून काँग्रेस भवनासमोर मेळावा होणार आहे. या मेळाव्यास जतमधील भाजपाचे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप येणार आहेत. या मेळाव्याला विशाल पाटील यांच्या व्यासपीठावर कोणकोण उपस्थित राहणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच महाविकास आघाडी नेत्यांचे आजच्या विशाल पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्ह्यातील युवा नेते विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांनाही नागपूरला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बैठकीला बोलावले होते.
त्या बैठकीनंतर अजून तोडगा निघाला नाही. त्यासंदर्भात निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही. आता काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनात कोण सहभागी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणातून माघार न घेण्याचा विशाल पाटील समर्थकांनी निर्धार व्यक्त केला आहे.
सांगलीच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यावरून जयंत पाटलांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. सोशल मीडियावर मला जबाबदार धरले जात आहे. पण त्यांच्या नेत्यांना काय केले, हे बघितले पाहीजे. जे लोक माझ्या बाबत वावडया उठवत आहेत,
त्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी लगवाला आहे.