बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र हे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळून लावलं होतं. मात्र त्यानंतर महादेव गित्ते याची रवानगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली, यावरून महादेव गित्तेच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडला नाही तर माझ्या पतीला मारहाण झाल्याचा दावा गित्तेची पत्नी मीरा गित्ते यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या मीरा गित्ते?
माझ्या पतीवर कारागृहात हल्ला करण्यात आला, त्या प्रकरणात मला गुन्हा दाखल करायचा होता, म्हणून मी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मात्र कारागृह प्रशासन आमच्या आधीन नाही, त्यामुळे तुम्ही कारागृह प्रशासनाकडे तक्रार करा अशी माहिती मला यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
वाल्मीक कराडला आतमध्ये चांगली व्यवस्था मिळावी यासाठीच माझ्या पतीला कारागृहातून बाहेर काढले आहे. वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने माझ्या पतीसह त्यांच्या मित्राला मारहाण केली आहे. उलट माझ्या पतीवरच मारहाण केल्याचा आरोप करत त्यांना बीड कारागृहातून हर्सुल कारागृहात स्थलांतरित करण्यात आलं. आतमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं याची माहिती समोर यावी म्हणून मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. मात्र अर्ज करून देखील मला फुटेज मिळालेलं नाहीये.
तुरुंगात असलेल्या नेहरकरच्या कुटुंबाला फोन आला होता, त्यादरम्यान वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांनी आम्हाला मारले आहे, असं आमच्या लोकांनी सांगितलं. माझा पती महादेव गित्ते यांना अमानुष मारहाण करण्यात आली, मात्र तरी देखील त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं नाही. माझ्या पतीच्या जीवाला कराड गँगपासून धोका आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळावं, आणि या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे, असं यावेळी महादेव गित्ते याच्या पत्नीनं म्हटलं आहे. सध्या महादेव गिते हा हार्सुल कारागृहात आहे.