राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर एक सभाही पार पडली. यावेळी महादेव जानकर यांना निवडून देण्याचं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं. पंकजा मुंडे यांनी तर यावेळी जोरदार फटकेबाजी केली. जानकर कोणत्याही चिन्हावर लढले असते तरी मी त्यांच्या प्रचारासाठी आले असते. शेवटी भाऊ विसरू शकतो, पण बहीण मात्र भावाला कधीच विसरत नाही, अशी टोलेबाजीच पंकजा मुंडे यांनी केली.
महादेव जानकर यांच्या प्रचारसभेला मी आज आले. मला काल जानकरांनी फोन केला. 1 एप्रिलला अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला वाटलं एप्रिल फुल करत आहेत. पण ते खरंच अर्ज भरणार होते. त्यांचा फोन आला आणि भावासाठी मीही आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी चौंडी येथील एक किस्साही सांगितला. चौंडी येथे मी आणि मुंडे साहेब गेले होते. तेव्हा मुंडे साहेबांनी जानकर यांना मुलगा म्हणून संबोधले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
महादेव जानकर यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली. जानकर अत्यंत साधे आहेत. बारामतीत ते लोकांमध्ये मिसळायचे. हापशीवर अंघोळ करायचे. शेतात झोपायचे. त्यावेळीही बहीण म्हणून मी त्यांना साथ दिली. सामान्य माणसांच्या विकासासाठी त्यांनी घर सोडले. म्हणूनच ते बाहेरून परभणीत आले असा विचार करणे योग्य नाही. बारामतीतून सुरू झालेला हा प्रवास भटकत भटकत परभणीत येऊन थांबला आहे, असं पंकजा म्हणाल्या.
महायुतीचा प्रचार करणे ही माझी जबाबदारी आहेच. पण जानकर कोणत्याही चिन्हावर लढले असते तरी मी त्यांच्या प्रचारासाठी गेले असते. शेवटी भाऊ विसरू शकतो, मात्र बहीण विसरत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
तुम्ही या लोकांसाठी इथे परभणीत घर घ्या. तुम्ही एकटेच आहात. तुमच्या घरासमोर वंचित पीडितांची गर्दी असली पाहिजे. गरीबांची साथ देऊन संधीची सोनं करा. मी आता लोकसभेत जाईल असे मला वाटले न्हवते. मात्र पक्षाचा आदेश आहे. पाच वर्ष पदावर नसताना मी लोकांमध्ये जात आहे. तरी देखील लोक माझ्या विकासाची उदाहरणे देतात. तुम्हाबाबत देखील असेच लोक म्हणावेत एवढी अपेक्षा आहे, असंही त्या म्हणाल्या.