महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर आले. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला. या जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत परिस्थिती निवाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी येवल्यात आणि वैजापुरात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहे. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केला. कोटी-दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे”, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.
“आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहोत. आमचा उद्देश हाच आहे, हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं. असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेलाय. जे असेल ते असेल. गुन्हा दाखल झाला असेल नोटीस येईल तेव्हा बघू”, अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली.