Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीत बंडोबांमुळे खेळखंडोबा? यंदा काय होणार?

| Updated on: Oct 22, 2024 | 10:40 PM

भाजपकडून 99 जणांची यादी जाहीर झाल्यानंतर 5 जागांवर शिंदे आणि भाजपात वाद सुरु झाले आहेत. धुळ्यात भाजपने उमेदवार घोषित केल्यामुळे शिंदे गटाच्या इच्छूकाने अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. तर ठाणे आणि कल्याणमधल्या भाजप उमेदवारांना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीत बंडोबांमुळे खेळखंडोबा? यंदा काय होणार?
Follow us on

2019 नंतर 2024 मध्येही शिवसेना-भाजपात जागांचा वाद आणि बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत. भाजपनं 99 जणांच्या पहिल्या यादीत शिवसेनेच्या वाट्यातल्या ३ जागांवर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता सुरु झालीय. धुळे शहर विधानसभा युतीत शिवसेनेकडे होती. यंदा तिथं भाजपनं अनुप अग्रवालांना तिकीट दिल्यानं शिंदे गटाचे इच्छूक मनोज मोरे आणि सतिश महाले नाराज झालेत. यापैकी मनोज मोरेंनी जरांगेंची भेट घेत पाठिंब्याची मागणी केलीय. वर्ध्यातली देवळी विधानसभा शिवसेना लढवत होती. यंदा तिथं भाजपनं राजेश बकानेंना तिकीट दिल्यामुळे शिंदे गटातील इच्छूक नाराज आहेत. नालासोपाऱ्याचीही जागा महायुतीत शिवसेना लढवत आलीय, पण यंदा भाजपनं राजन नाईकांना उमेदवारी दिल्यामुळे शिंदे गटाचे नवीन दुबे अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच दोन जागा अशाही आहेत, ज्या भाजपच्या वाट्याला असल्या तरी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास शिंदे गटानं नकार दिलाय.

कल्याण पूर्व विधानसभेत भाजपनं सुलभा गायकवाडांना तिकीट दिलं. सुलभा गायकवाड या भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या गायकवाडांनी थेट पोलीस चौकीतच गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारानंतर गणपत गायकवाडांनी शिंदेंवर गंभीर आरोपही केले होते. तेव्हापासून गायकवाड आणि शिंदे गटात मोठं वितुष्ट निर्माण झालंय. त्यांच्याच पत्नीला भाजपनं तिकीट दिल्यानं शिंदे गटात नाराजी पसरलीय. माहितीनुसार, याच मुद्दयावर वर्षा बंगल्यात शिंदे-फडणवीसांमध्ये बैठकही झाली. सुलभा गायकवाडांना उमेदवारी देणं हा चुकीचा संदेश असल्याचं शिंदे म्हणालेत. दरम्यान याठिकाणी स्थानिक शिंदे समर्थक भाजपचं काम न करण्यावर ठाम आहेत.

कुठे-कुठे बंडाची शक्यता?

  • दुसरा वाद ठाणे शहरात भाजपनं उमेदवारी दिलेल्या संजय केळकरांवरुन सुरुय. केळकर भाजपचे असले तरी याआधीपासून ते शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेत आले आहेत. सत्तेत असूनही अनेक कंत्राटांवरुन त्यांनी शिंदे गटावर आरोप केलेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनाच भाजपनं तिकीट का दिलं? असा सवाल शिंदे गटाच्या संजय भोईरांनी केलाय.
  • 2019 ला बंडखोरीच्या ग्रहणामुळेच युतीला फटका बसला होता. पारोळा, पाचोरा, चोपडा, जळगाव ग्रामीण, चंदगड, कागल, वांद्रे पूर्व, बार्शी, धुळे शहर, देवळी, नांदेडसह अनेक जागांवर शिवसेना-भाजपच्या बंडोंबामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुकर बनला होता. उदाहरणार्थ बार्शी विधानसभेत शिवसेनेच्या दिलीप सोपलांविरुद्ध राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर उभे होते. पण इथं अपक्ष उभ्या राहिलेल्या राजेंद्र राऊतांना स्थानिक भाजपची साथ मिळाली. परिणामी शिवसेनेचे सोपल 3,076 मतांनी पराभूत होऊन अपक्ष राऊत विजयी झाले. निकालानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
  • वांद्रे पूर्वेत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वरांविरोधात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी लढले. पण शिवसेनेच्याच तृप्ती सावंतांनी बंडखोरी केली. परिणामी मातोश्रीच्याच अंगणात शिवसेनेचे महाडेश्वर काँग्रेसविरोधात ५ हजार ७९० मतांनी पराभूत झाले.
  • नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेच्या राजश्री पाटलांविरोधात काँग्रेसचे मोहन हंबर्डे लढले. पण भाजप बंडखोर दिलीप कंदकुरतेंमुळे काँग्रेसचा विजय सोपा झाला.
  • धुळे विधानसभेत शिवसेनेच्या हिलाल माळींविरोधात अपक्ष म्हणून राजवर्धन कदमबांडे, लोकसंग्रामचे अनिल गोटे आणि एमआयएम अशी चौरंगी लढत झाली. मतांच्या विभागणीत धुळ्यात पहिल्यांदा एमआयएमचा विजय झाला.
  • जळगाव जिल्ह्यात तर शिवसेनेच्या अनेक उमेदवारांची मुख्य लढत ही भाजपच्या बंडखोरांसोबतच राहिली होती.
    पारोळा, पाचोरा, जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेविरोधात भाजप बंडखोरांनी दंड थोपडले होते.
  • यंदा बंडखोरांना वेळीच थंड करणं महायुतीपुढचं आव्हान असणार आहे. कारण, 2019 ची लढत ही थेट शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीत होती. यंदाची लढत मात्र भाजपसह शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे मतांचं विभाजन कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही पक्षाचं गणित बदलवू शकतात.