पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : गावगाड्याच्या कारभाराचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. कुणाच्या हाती गुलाल येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यातील बदललेल्या समीकरणामुळे हा निकाल कसा लागतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं. गावगाड्याची निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची असते. त्यात पक्ष असा नसतो. पण गेल्या काही निवडणुकांपासून राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पडद्यामागून हालचाली सुरू केल्याने या निवडणुकांनाही राजकीय रंग आला आहे. त्यामुळे हा रंग आज कोणत्या पक्षाला लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
काल रविवारी राज्यातील 2359 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत राज्यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. या मतदानाला प्रचंड प्रतिसाद लाभला. पालघरमध्ये तर संध्याकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरू होतं. तर काही ठिकाणी मतदानाला कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, एकूण चित्र पाहता राज्यात मतदानाचा उत्साह होता. गावगाड्याच्या या निवडणुकीला काल काही ठिकाणी गालबोट लागलं. कोल्हापूरसह अनेक ठिकाणी दोन गटात राडे झाले. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तर काही ठिकाणी शांततेत मतदान झालं. बीडमध्ये नुकताच हिंसाचार झाला. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. मात्र, मतदानावेळी बीड जिल्ह्यात कोणतीही गडबड झाली नाही.
गावगाड्याच्या या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आदी नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना जोडण्यासाठी या नेत्यांनी गावगाड्यातील लोकांशी संपर्क साधून त्यांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न किती यशस्वी ठरला हे सुद्धा आजच थोड्यावेळात स्पष्ट होणार आहे.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राष्ट्रवादी फुटल्याने राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. अजित पवार आणि शरद पवार गट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा अजितदादा गट हा सत्तेत आहे. तर शरद पवार गट विरोधात आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिलीच गावगाड्याची निवडणूक आहे. त्यामुळे गावगाड्यातील मतदार कुणाच्या बाजून कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.