ahmednagar name change ahilya nagar: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, धारशिवच्या नामांतरनंतर आणखी एका जिल्ह्याचे अन् शहराचे नाव बदलले आहे. महाष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आजपासून अहिल्यानगर झाला आहे. राज्य शासनाने त्यासंदर्भातील अधिसूचनासुद्धा बुधवारी काढली आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर ९ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात तसे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धारशिव नामांतर महायुती सरकारने केले होते.
इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर या अहमदनगर जिल्ह्यातील होत्या. त्यांचा जन्म मराठी हिंदू कुटुंबात अहमदनगर जिल्ह्यातील चंडी गावात झाला. माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे हे त्यांचे आई-वडील होते. त्यांचे लग्न इंदूरच्या होळकर परिवारात झाले. त्यांनी धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे शासन सामाजिक कल्याण आणि मानवतावादी कार्यासाठी देशभर प्रसिद्ध झाले. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे, घाट आणि धर्मशाळा बांधण्यासाठी भरभरुन मदत केली. पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी होळकर घराण्याचा कारभार हाती घेतला.
विधानसभा निवडणुका आता राज्यात काही दिवसांत जाहीर होणार आहे. त्यापूर्वी महायुती सरकारने धडाकेबाज निर्णयांचा धडाकाच लावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा विषय प्रलंबित होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास 300 वर्ष पूर्ण होत असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी झाली. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रम घेतला होता. तेव्हा अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला शब्द आता पूर्ण केला.