भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने अशा जागांवरही उमेदवार घोषित केले आहेत ज्या ठिकाणी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा त्या मतदारसंघांमध्ये पराभव झाला होता. यामुळे या निवडणुकीत जिंकून येण्याच्या मेरीटचं कारण देत भाजपने या जागांवर आपले उमेदवार उतरवल्याची चर्चा आहे. भाजपचे गेल्या निवडणुकीत 105 आमदार निवडून आले होते. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. या निवडणुकीत भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट किती जागांवर निवडणूक लढवणार? याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
शिवसेनेकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा, उरण, धुळे शहर, अचलपूर, देवली या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्यात आले होते. शिवसेनेकडून नालासोपाऱ्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता. तर उरणमध्ये शिवसेनेकडून मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी त्यांचा पराभव केला होता. महेश बालदी यांनाच यावेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
शिवसेनेकडून गेल्या निवडणुकीत धुळे शहरात हिलाल माळी यांना उमेदवारी दिली होती. पण एमआयएमचे उमेदवार फारुक शाह यांनी त्यांचा पराभव केला होता. अचलपूरमध्ये शिवसेनेकडून सुनीता फिस्के यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांचा पराभव केला होता. देवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण काँग्रेसचे उमेदवार रणजीत कांबळे यांनी त्यांचा पराभव केला होता. या सर्व पाचही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपने या सर्व पाचही जागांवर दावा करत आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान, भाजपची पहिली यादी ही चांगलीच चर्चेची ठरली. कारण या पहिल्या यादीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनादेखील उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित जागांवर विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.