महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. महायुतीला 90 ते 95 टक्के बंडखोरी रोखण्यात यश आलं. पण महाविकास आघाडीला तितक्या प्रमाणात बंडखोरीला वेसण घालता आली नाही. एकूण 288 जागांसाठी 4140 उमेदवार रिंगणात होते. त्यात महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार आहेत. बीडच्या माजलगावमध्ये सर्वाधिक 34 उमेदवार रिंगणात आहेत. कालच्या दिवसात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. माहीममध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालय. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला नकार दिला. अखेरच्या क्षणी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. काँग्रेसमध्ये जे काही घडलं, त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना रडू कोसळलं.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा नारळ आज फुटला. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माचनुर येथील शंभु महादेव मंदिरात शक्ती प्रदर्शन करीत अनिल सावंत यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. आघाडीत बिघाडी झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत.
धुळे शहरात एमआयएमचे उमेदवार आमदार फारुक यांच्या प्रचारार्थ ओवेसी यांची सभा आहे. शहरातील शंभर फुटी रोडवर एमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दिन ओवेसी यांची सभा होणार आहे. सभेसाठी नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, मला पुन्हा राज्यसभेवर जायचे की नाही याचा विचार करावा लागेल. जनतेने त्यांना 14 वेळा निवडून दिले आहे. आता त्यांना कुठेतरी मुक्काम करावा लागेल. नवीन टीम आणावी लागेल.
जमशेदपूरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की झारखंडमधील काँग्रेस-आरजेडी-जेएमएम युती विकासाच्या बाजूने नाही. हे लोक विनाशाचे दूत आहेत. त्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. वाळू माफिया, खाण माफिया, भूमाफिया आणि कोळसा माफिया आणि त्यांनी आता बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या अवैध स्थलांतराला परवानगी दिली आहे.
झारखंडमधील अवैध खाण प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने 3 राज्यांमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने ज्या ठिकाणी छापे टाकले आहेत त्यापैकी 11 ठिकाणे साहिबगंज आणि 3 रांचीमध्ये आहेत, तर एक कोलकाता आणि एक पाटणा येथे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात सुमारे 11 सभांना संबोधित करणार आहेत. याशिवाय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी सुमारे 20 ते 22 सभांना संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुमारे 18 रॅलींचा प्रस्ताव दिला असून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सुमारे 13 रॅलींचा प्रस्ताव दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुडचे उमेदवार महेंद्र दळवी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटीला गेले आहेत. कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर महायुतीतील नासका कांदा अशी जहरी टीका केली होती. त्यामुळे महायुतीतील रायगड जिल्ह्यातील मतभेद समोर आले होते. आता याची सावरासावर करण्यासाठी अलिबाग-मुरुडचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. नरीमन पॉईंट येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी यांची भेट होतेय.
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का बसला आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी प्रवीण मानेंना पाठिंबा जाहीर केला आहे. मयूर पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू असून,इंदापुरात त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. यावेळी मयूर पाटील यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
परभणीच्या गंगाखेड येथे महायुतीत उभी फूट पडल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे यांचे सख्खे मेहुणे, माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी महायुतीच्या विरोधातातील मविआ उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. गंगाखेड विधानसभेत रासपचे रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे विशाल कदम अशी ही लढत आहे. धनंजय मुंडे यांचे मेहुणे डॉक्टर केंद्रे यांच्या निर्णयामुळे महायुतीला मोठा झटका लागला आहे.
चंद्रकांत खैरे हे शहराचे 25 वर्ष खासदार आणि दहा वर्ष आमदार होते आणि माझ्या वडिलांचे सहकारी आहेत त्यामुळे मी त्यांच्या पाया पडतो आणि राजकारणात वडील माणसांच्या पाया पडणे हे संस्कृती आहे त्यात नवल काय असे मंत्री अतुल सावे यांनी म्हटले आहे.
आम्ही काय केले हिशोब देतो, तुम्ही काय केले त्याचा हिशोब द्या, तुम्ही फक्त स्पीड ब्रेकरचे काम केले योजना बंद पाडल्या असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.
विरोधक वचननाम्यात लाडकी बहिण योजना देतो म्हणतात ते फसवणार आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील सभेत म्हटले आहे.
“कोल्हापुरातून चांगली सुरुवात झाली. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळूमामांचा आशीर्वाद घेतला. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“सतेज पाटील सोबत आहेत, याचा मला आनंद आहे. आताची लढाई ही महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही अशी आहे. सगळा महाराष्ट्र अदानीला विकला जातोय. खोके सरकारला आता भस्म करण्याचा क्षण आला आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“आम्हाला बळ दिलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आणखी वाढवणार. दीड हजार रुपयांचं तीन हजार रुपये करणार. या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय”, अशी टीका शिंदेंनी केली.
“खरंतर या सभेला मला यायची गरज नव्हती, पण या जनतेचं मला दर्शन घ्यायचं होतं. महेशचं काम मजबूत आहे. त्यांना काँक्रीट आमदार म्हणतात. 65 गावांना पाणी देणारा हा पाणीदार आमदार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“दोन वर्षांपूर्वी आम्ही ज्यावेळेस उठाव केला, त्यावेळी सर्वात पुढे महेश शिंदे होते. या राज्यामध्ये जे अनैसर्गिक सरकार होतं ते उलटून टाकायचं काम आम्ही केलं. खुर्चीसाठी, सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडायचं काम केलं. महेश शिंदे हा माझा भरवशाचा बॅटमन आहे. चौकार, षटकार मारल्याशिवाय राहणार नाही,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात, बांधावर जाऊन काम करत आहोत. बाळासाहेबांचा गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही मुक्त केला. स्वत:च्या जीवावर महेश शिंदेंनी कोविड सेंटर उभं केलं,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी दिल्ली – उत्तर प्रदेश मदरसा ॲक्ट 2004 बाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेश मदरसा ॲक्ट 2004 ला मान्यता मिळाली. उत्तर प्रदेश मदरसा ॲक्ट संविधानिक रूपाने बरोबर असल्याचं कोर्टाने म्हटलंय. 22 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता.
साताऱ्यातील शेंद्रें येथे एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुणे बँगलोर महामार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहनांच्या तपासणी दरम्यान पोलिसांना मोठी रक्कम सापडली आहे. सातारा जिल्ह्यात सोने व रोख रक्कम सापडण्याची ही तिसरी वेळ आहे.
“पवार साहेबांचा मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलो आहे. बारामतीचा खरा विकास हा शरद पवार यांनी केला”, असे विधान युगेंद्र पवार यांनी केले. “पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला आणि इथून पुढे देखील कोणी सोडवणार ते फक्त शरद पवार सोडवतील. माझं काम करण्याचे व्हिजन मी गावांच्या भेटीत सांगणार आहे. मी तुमच्यासाठी दिवस रात्र काम करून पूर्ण वेळ देणार आहे. सर्वांचे प्रश्न ऐकून ते मार्गी लावण्याचा माझा कायम प्रयत्न असणार आहे”, असेही युगेंद्र पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. आता लवकरच ते कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी चंद्रहार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.
कोकणी जनता आणि ठाकरे परिवार यांचे अतूट नाते आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रचार सभा कोकणात घेतली, असे विधान भास्कर जाधव यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे यांची सभा महत्त्वाची आहे. कोकणातील सर्व उमेदवारांच्या विजयाच्या दृष्टीने उध्दव ठाकरे यांची सभा आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.पक्षासोबत गद्दारी केलेल्या एकाही खासदार अथवा आमदाराला उद्धव ठाकरे यांनी पक्षात परत घेतले नाही. राज्यातील जनतेची देखील हीच भावना, असे भास्कर जाधव म्हणाले.
नालासोपारा – हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, टीसी रितेश मोर्या यांची मराठी दांपत्यासोबत दादागिरी. रेल्वेत मराठी चालणार नाही, अशी दमदाटी टीसीने प्रवाशांना केल्याचे समोर आले आहे.
महागाई आणि प्रशासनाच्या अपयशांवर महायुती सरकारवर घणाघात करणारी मविआची आणखी एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
आज महाविकास आघाडीने महायुती सरकारवर थेट निशाणा साधणारी आणखी एक जोरदार जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्ये गॅस आणि पेट्रोलसारख्या आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे त्या महाराष्ट्रातील घरांपर्यंत पोहोचणे कठीण झाल्याचे दाखवण्यात आलं आहे.
बंटी पाटील यांनी काल दिलेली रिॲक्शन ही योग्यच. कोल्हापूर उत्तरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हक्काची होती. दुर्दैवाने आम्हाला मतदारसंघ मिळाला नाही. काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूरमध्ये आहेत ते या संदर्भातील योग्य तो निर्णय घेतील.
राजापूर मत विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली होती, वरिष्ठांचा आदेश न पाळता बंडखोरी झाली आहे
राजन साळवी यांचा विजय नक्की आहे, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात पोलिसांच्या वतीने पथसंचालन. धुळे शहर विधानसभा क्षेत्रातील मिल परिसरामध्ये पोलिसांच्या वतीने केंद्रीय पोलीस दल, स्थानिक पोलीस पथसंचालनात सहभागी झाले. कायदा व्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांच्या वतीने शहरातील विविध भागात पथसंंचलन करण्यात आलं.
शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे. राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही, राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे , असं शरद पवार म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ स्वाभिमान सभेचे शिरसुफळ येथे आयोजन करण्यात आलं होतं, तेथे ते बोलत होते.
गोंदिया जिल्ह्यातील चार जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात… 39 उमेदवारांची रिंगणातून माघार… अर्जुनी मोरगावात – 19, तिरोडात- 21, गोंदिया-15 तर आमगाव – 9 उमेदवार…
शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे हे सर्वांना माहिती आहे… शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी… बाळासाहेब राज ठाकरे यांना माफ करणार नाहीत… मोदी – शहांनी बाळासाहेबांची प्रॉपर्टी शिंदेंना दिली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
निवडणूक आयोगानं उशिरा का होईना शहाणपणाचा निर्णय घेतला… गृहमंत्र्यांना नैतिकता प्रशासन कळत नाही… सरकारने अनेक नियुक्त्या बेकायदेशीरच केल्यात… रश्मी शुक्लांवरून संजय राऊतांची सरकारवर टीका…
बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष… कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन… आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन… कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमा राजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता…
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं गेलं. सोलापूर शहर मध्य मध्ये चौरंगी लढत होणार आहे.काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे नरसय्या आडम तसेच एमआयएमचे फारूक शाब्दी आणि भाजपकडून देवेंद्र कोठे अशी चौरंगी लढत असणार आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ही पदयात्रा काढण्यात आली.
कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन होणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
कोल्हापूरमध्ये आज महायुतीची पहिली एकत्रित प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूरच्या मेरी वेदर मैदानावर प्रचार सभा होणार आहे. मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या निर्धार सभेची जय्यत तयारी सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार महायुतीचा प्रचार शुभारंभ होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या बुधवारी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी चिंचवड विधानसभेत पहिली प्रचार सभा होणार आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे असा सामना रंगणार आहे.
उद्धव ठाकरे कोकणातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा करणार शुभारंभ. आज कोल्हापूर दौऱ्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सभा. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ ठाकरेंची होणार जाहीर सभा. उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी. रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा.
“भाजपा पक्षाला आता अहंकार आला आहे, सत्तेचा माज आला आहे. मी बंडखोरी करत माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण भाजपाचा जिल्हाध्यक्ष किंव कोणत्याही पदाधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क केला नाही. त्यामुळे मी नालासोपारा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणुकीत राजन नाईक यांच्याकडून आम्हाला खूप वाईट आनुभव आला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता” असं भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष भगत यांनी सांगितलं.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार निवडणुक रिंगणात. दापोली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त 9 उमेदवार निवडणुक रिंगणात. गुहागर विधानसभा मतदार संघात 7, चिपळूण विधानसभा मतदार संघात 6 तर रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 8 उमेदवार रिंगणात. पाच पैकी चार विधानसभा मतदार संघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत.
सिंधुदुर्गातील भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विशाल परब यांनी बंडखोरी केली होती.वरिष्ठांनी समज देऊन देखील विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हकालपट्टी केली. निवडणूक काळात विशाल परब यांना मदत करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर देखील दिले कारवाईचे संकेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. एकूण 288 जागांसाठी 4140 उमेदवार रिंगणात होते. त्यात महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार आहेत. बीडच्या माजलगावमध्ये सर्वाधिक 34 उमेदवार रिंगणात आहेत.