महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जोरात प्रचार सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांच्या सभा सुरु आहेत. राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काही नेते मंडळींनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, तर काहींनी कॅमेऱ्यासमोर वादग्रस्त कृती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आज ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाणे जिल्हातील पालघर,बोईसर,अंबरनाथ,कल्याण (पश्चिम), कल्याण ग्रामीण आणि कळवा-मुंब्रा विधानसभेत जाहीर सभा घेणार आहेत. जितेंद्र आव्हाड याच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री सभा घेत असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यात माधवी लता यांची आज सभा आहे. पुण्यात कोथरूड येथे आज सायंकाळी 7 वाजता होणार सभा. कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी घेणार सभा. हिंदू स्वाभिमान मेळावा असं सभेला नाव देण्यात आलं आहे.
दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आयुष्मान भारत योजने’ अंतर्गत देशातील सुमारे चार कोटी लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. आयुष्मान भारत योजना नसती तर यातील बहुतांश लोकांना रुग्णालयात दाखल केले नसते. एनडीए सरकारच्या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यातील एक मोठी चिंता दूर झाली याचा मला आनंद आहे. आयुष्मान योजनेद्वारे करोडो कुटुंबांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांची बचत केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “बेकायदेशीर घुसखोरीवर धडक मारत आसाम पोलिसांनी करीमगंजमध्ये 6 बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना पकडले आणि त्यांना सीमा ओलांडून परत पाठवले.”
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील जगतदल भागात बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अशोक शॉ असे मृताचे नाव आहे.
पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळेस बॅगेत फक्त कपडे आहेत, बाकी काही नाही. युरीन पॉटही नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. उद्धव ठाकरे यांनी त्यांची बॅग तपासणी केल्याने निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांचा व्हीडिओ काढला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शाह यांचीही बॅग तपासल्याचा व्हीडिओ आला पाहिजे, असं म्हटलं होतं.
नारायण राणेंच्या होम पीचवर कणकवली येथे उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.भर दुपारी सभेचे आयोजन तरीही लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळत आहे.
लातूर विमानतळावर काँग्रेस अध्यक्ष मलिकर्जुन खरगे यांच्या बॅगेची निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. खर्गे हे लातूरमध्ये महाविकास आघाडी उमेदवार यांच्या जाहीर सभेसाठी आले होते. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
गृहमंत्री अमित शाह यांनी चाळीसगाव येथील प्रचार सभेतून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी दहशतवादावर ठोस कारवाई केली नाही. तर मोदींनी जवळपास दहशतवाद संपवलाय. मोदींनी देशाला समृद्ध करण्याचं काम केलंय, असं अमित शाह म्हणाले.
दिल्लीत बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान जाळले होते,हे तेच लोक आहेत ज्यांनी संविधानला रामलीला मैदानावर जाळले होते,याचा बदला घ्या असे आवाहन कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी लातूरात केले आहे.
50 खोके घेतले त्यांना घरी बसवा,ती वेळ आली आहे, संधी चुकीली तर तुम्ही राहणार नाही असे कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी लातूर येथे म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरु नका. स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.
रायगड, ठाणे शहर आणि नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. खारघर सेक्टर २९ मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी ५० हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता असून यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्यात आले. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. हेलिकॉप्टरद्वारे देखील सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.
बारामतीत अजित पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. अजित पवार हे बारामतीहून बीडला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्यात आली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
शिर्डी / अहिल्यानगर : शरद पवारांचे राहाता शहरात आगमन झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा होणार आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली आहे. शिर्डी मतदारसंघातील राहाता शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित राहणार आहे. शिर्डीमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध प्रभावती घोगरे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे आज शरद पवार आज विखे पाटलांबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
“मै मुख्यमंत्री बदलनेकी ताकद रखता हूँ”, अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात प्रचारावेळी अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं.
कोल्हापूर- निवडणुकीच्या धामधूमीमुळे राज्यातील ऊस हंगामाला ब्रेक लागला आहे. यावर्षी देखील ऊस गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. नोहेंबर महिना अर्धा संपला तरी कारखान्याची धुरांडी विझलेलीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रचारात व्यस्त आहेत. तर तोडणी मजुरांनीदेखील पाठ फिरवली आहे. मतदानानंतरच ऊस तोडणी मजूर कारखान्याकडे येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे एक महिना गळीत हंगाम लांबला होता. यावर्षी निवडणुकीमुळे हंगाम लांबणार असल्याने सलग दोन वर्ष ऊस उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
“एखाद्या दोषीचे घर कायद्याच्या प्रक्रियेचे पालन न करता पाडल्यास, त्याचं कुटुंब नुकसानभरपाई मिळवण्यास पात्र असेल, पक्षपातीपणे कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई करू नये अन्यथा याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुनावणी झाल्याशिवाय कोणालाही दोषी म्हणता येणार नाही. कार्यपलिका ही न्यायाधीश होऊ शकत नाही तसेच ती आरोपीची मालमत्ता पाडण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. न्यायदानाचे काम न्यायपालिका करेल, कार्यपालिका ही न्यायपालिकेचे काम करू शकत नाही,” अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे.
बुलडोझरच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. “तुम्ही केवळ आरोपी आहात म्हणून कोणाचे घर पाडू शकत नाही. अधिकारी आणि सरकारची मनमानी वृत्ती योग्य नाही, देशात कायद्याचे राज्य हवे,” अशा शब्दांत कोर्टाने सरकार आणि प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.
नाशिक- उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सिन्नरमध्ये जाहीर सभा आहे. काठी घोंगडी देऊन शरद पवार यांचं स्वागत करण्यात आलं. उदय सांगळे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सांगळे यांच्या उमेदवारीने अजित दादा गटाचे माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आव्हान आहे.
सिंधुदूर्ग- माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी इथल्या जाहीर सभेत पक्षप्रवेश होणार आहे. ब्रिगेडियर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता. नंतर ते आप पार्टीत सहभागी झाले होते. शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता. आज ते शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
कोल्हापुरात बोगस तपासणी पथकाने व्यवसायिकाचे 25 लाख रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून फसवणूक केली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली आहे.
चित्रपट अभिनेता शिवसेना नेते गोविंदाच्या तक्रारीनंतर त्याच्या जुहू येथील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गोविंदा शिवसेनेचा सतत प्रचार करत आहेत. गोविंदा हा शिवसेनेचा स्टार प्रचारक आहे. त्याच्या तक्रारीनंतर रात्री घरावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 1 जानेवारी ते 5 नोव्हेंबर दरम्यान 102 पिस्तूल जप्त कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार कारवाईचा करून बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी 143 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
सिंचन घोटाळ्याचे 70 हजार कोटींचे आरोप फडणवीस यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही वारंवार भ्रष्टाचारी म्हणत होता. मग त्यावेळी गोपीनियतेची शपथ घेणाऱ्या फडणवीस यांनी यासंबंधीची फाईल अजितदादांना कशी दाखवली? हा गुन्हा नाही का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. फडणवीसांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल असे त्या म्हणाल्या.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या सांगण्यावर अजितदादा पुन्हा महायुतीत गेले का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हे सरकार अदानी चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रिसोड विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची थोड्याच वेळात मालेगांव शहरात जाहीर सभा होत आहे. तर कारंजा विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी इथं 12 वाजता जाहीर सभा होईल
गौतम अदानी यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या त्यासाठीच बैठका होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“गौतम अदानीला हे सरकार नको होतं. ही मुंबई महाराष्ट्र त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे. म्हणून मोदी-शाह यांनी आधी शिवसेना तोडली. त्यासाठी अदानीचा वापर केला, हे त्यांच्या सरकारमधले अजित पवार सांगत आहेत, यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात घेणार पाच सभा. महाविकास आघाडीचे रत्नागिरीतील उमेदवार आणि भास्कर जाधव यांचे सख्खे साडू बाळ माने यांच्यासाठी भास्कर जाधव मैदानात. बाळ माने हे रत्नागिरीचे माजी आमदार, त्यांनी भाजप सोडत शिवसेना उबाठात केला आहे प्रवेश. रत्नागिरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उदय सामंत विरुद्ध उबाठाचे बाळ माने अशी लढत.
“अजित पवार यांच्यानुसार आमचं सरकार उद्योगपतींनी पाडलं. गौतम अदानी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वारंवार बैठक व्हायची. सरकार पाडण्यासाठी बैठका होत होत्या. शरद पवार की अदानींनी पक्ष फोडला हे अजितदादांना विचारा” “पैशाच वाटप सर्रास सुरु आहे. जिथे पैसे पोहोचवायचे ते शिंदे, फडणवीस, अजितदादांनी पोहोचवले” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
सांगलीच्या जत विधानसभा निवडणुकीत लिंगायत धर्मगुरूंना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. भाजपाचे जत विधानसभाचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून हा प्रकार घडल्याचा आरोप.